खेड, इचलकरंजी आघाडीवर नगराध्यक्ष सुवर्णचषक व्हॉलिबॉल
By admin | Published: February 15, 2015 10:55 PM2015-02-15T22:55:36+5:302015-02-15T23:50:17+5:30
व्हॉलिबॉल स्पर्धेची पहिली फेरी रविवारी घेण्यात आली. त्यावेळी पाच नगरपरिषदांच्या संघांत सामना झाला
विटा (जि. सांगली) : विटा नगरपरिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नगराध्यक्ष सुवर्णचषक क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या फेरीत व्हॉलिबॉल सामन्यात घाटंजी (जि. यवतमाळ), अचलपूर, खेड, इचलकरंजी व हिंगोली नगरपरिषदेच्या संघांनी आघाडी घेतली. व्हॉलिबॉल स्पर्धेची पहिली फेरी रविवारी घेण्यात आली. त्यावेळी पाच नगरपरिषदांच्या संघांत सामना झाला.या व्हॉलिबॉल स्पर्धेत पहिल्या फेरीचा सामना घाटंजी विरुद्ध श्रीवर्धन यांच्या संघात झाला. हा सामना घाटंजी (यवतमाळ) संघाने जिंंकला. त्यानंतर इचलकरंजी विरुद्ध बदलापूर यांच्यातील सामना इचलकरंजीने जिंकला. खोपोली विरुद्ध हिंगोली यांच्यातील सामना हिंगोली पालिकेच्या संघाने, राजापूर विरुद्ध अचलपूर यांच्यातील सामना अचलपूरच्या संघाने आणि खेड विरुद्ध अंबाजोगाई यांच्यातील व्हॉलिबॉल सामना खेड नगरपरिषदेच्या संघाने जिंकून पहिल्या फेरीत आघाडी घेतली.
यावेळी नगराध्यक्ष सुवर्णचषक क्रिकेट स्पर्धाही झाली. पहिल्या फेरीत रविवारी पेठवडगाव, पंढरपूर, मानवत, परभणी, पनवेल, रत्नागिरी, दापोली, तासगाव, तातडी, बदलापूर, इचलकरंजी, कऱ्हाड, वाई, खेड, कुरुंदवाड, पूर्णा, फलटण या नगरपरिषदेच्या संघांनी क्रिकेट सामन्यात आघाडी घेतली. खो-खो स्पर्धेत फलटण विरुद्ध विटा यांच्यातील सामना विटा पालिकेच्या संघाने जिंकला, तर कबड्डी सामन्यात इस्लामपूर, तासगाव, मनमाड, हिंगोली, पाथरी व खेड नगरपरिषदेच्या संघांनी पहिल्या फेरीत विजयी सलामी दिली. राज्यस्तरीय नगराध्यक्ष सुवर्णचषक क्रीडा स्पर्धेमुळे विटा शहर क्रीडामय झाले आहे. (वार्ताहर)