शिवरायांचा पुतळा घडविणारे खेडकर

By Admin | Published: August 14, 2016 12:41 AM2016-08-14T00:41:11+5:302016-08-14T01:03:26+5:30

शिवाजी विद्यापीठात भव्य पुतळा : महाराजांच्या पुतळ्यांमुळे राज्यभर ओळख

Khedkar, who created Shiva statue statue | शिवरायांचा पुतळा घडविणारे खेडकर

शिवरायांचा पुतळा घडविणारे खेडकर

googlenewsNext

कोल्हापूर : युगपुरुष शिवाजी महाराजांचे नाव ऐकले तरी मान अभिमानाने उंचावते, ज्यांच्या नावाने आपले विद्यापीठ प्रस्थापित झाले आहे, त्या छत्रपती शिवरायांचा एक पुतळा शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात असावा; त्यांच्या ठायी नतमस्तक होऊनच येथे प्रवेश व्हावा, अशी शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेला मूर्त स्वरूप दिले ते शिल्पकार बी. आर. खेडकर यांनी.
ऊर्जामयी युगपुरुषाचे स्फुल्लिंग चेतविणारे हे स्मारक कोल्हापूरचे वैशिष्ट्य बनले आहे. या पुतळ्यानंतर खऱ्या अर्थाने बी. आर. खेडकर यांची ‘शिवाजी महाराजांचे शिल्प घडविणारे कलाकार’ अशी ओळख झाली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात शिवाजी महाराजांंचे अनेक पुतळे बनविले. या पुतळ्याच्या रूपाने त्यांच्या स्मृती चिरंतन राहणार आहेत.
पुतळा उभारणीसाठी अप्पासाहेब पवार यांनी १९७० मध्ये वृत्तपत्रांतून जाहीर प्रकटन करून पुतळ्याची मॉडेल्स मागविली. त्यातून पुण्यातील बी. आर. खेडकर यांचे मॉडेल पसंत करून काम त्यांच्याकडे सोपविले. त्यावेळी पुतळ्याची किंमत ६५ हजार रुपये ठरली. छत्रपती शिवाजी महाराजांंचा अश्वारूढ पुतळा बनविण्यासाठी खेडकर यांनी खूप अभ्यास केला. यासाठी ते पुण्यातील रेसकोर्सवर घोडे पाहण्यासाठी जात आणि घोडा कसा धावतो, थांबतो याचे बारकाईने निरीक्षण करीत. तसेच शिवरायांचा चेहरा, त्यांची आभूषणे, पोशाख, त्यांचा लगाम खेचून उभा केलेला घोडा, आदींबाबत अभ्यास केल्यानंतर १९७१ मध्ये पुतळ्याचे काम सुरू केले. त्यासाठी त्यांनी स्टुडिओमध्ये उमदा घोडा आणला. होता. तीन वर्षांत त्यांनी पुतळा साकारला.
छत्रपती शिवरायांचा हा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा आहे. तो ब्रॉँझमध्ये बनविण्यात आला असून, त्याची उंची १८ फूट आणि वजन आठ टन आहे. जमिनीपासून त्याची उंची १८ फूट ६ इंच आहे. पुतळा आणि चौथऱ्याची एकूण उंची २६ फूट ६ इंच असून, घोड्याची लांबी २० फूट आहे. त्या काळी अठरा फूट उंचीचा हा पुतळा पुण्यातून कोल्हापुरात आणणे शक्य नव्हते. त्यामुळे विद्यापीठात पुतळा जोडण्याचे ठरले. त्यानुसार विद्यापीठात दोन महिने राहून खेडकर यांनी पुतळा जोडण्याचे काम केले.
चबुतऱ्याचे काम कांचीपुरम्मधील डॉ. अमरेंद्रकुमार यांनी पूर्ण केले. पुतळ्याचे अनावरण १ डिसेंबर १९७४ रोजी तत्कालीन परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते, मुख्यमंत्री वसंतराव नाईक, आदींच्या उपस्थितीत झाला. या कलाकृतीनंतर शिल्पकार खेडकर यांचे नाव झाले. पुढे विद्यापीठाने त्यांचा गौरव केला. त्यानंतर त्यांनी देशभरात शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे साकारले. याशिवाय त्यांनी स्टॅँड परिसरातील राजीव गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील यांचाही पुतळा साकारला. स्वयंसिद्धा संस्थेच्या संचालिका तृप्ती पुरेकर या त्यांच्या कन्या होत. ( प्रतिनिधी)


शिल्पकार बी. आर. खेडकर यांच्या निधनामुळे एक महान कलाकार काळाच्या पडद्याआड गेला. विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या रूपात खेडकर यांच्या स्मृती विद्यापीठ चिरंतन जपेल. हा पुतळा भारतीय शिल्पकलेचा एक अत्युत्तम नमुना असून, तो भावी पिढीला प्रेरणा देत राहील.
- डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू,
शिवाजी विद्यापीठ

Web Title: Khedkar, who created Shiva statue statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.