‘खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर’ची ३ जानेवारीपासून मोहीम : सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:17 AM2020-12-27T04:17:50+5:302020-12-27T04:17:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापुरातील स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने शहरात ‘खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर’ ही मोहीम ३ जानेवारीपासून राबविण्याची घोषणा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापुरातील स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने शहरात ‘खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर’ ही मोहीम ३ जानेवारीपासून राबविण्याची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी केली. स्वयंसेवी संस्थांसह नागरिकही स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार असून, प्रत्येक ग्रुपला एक रस्ता दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्री पाटील म्हणाले, पुण्यात ‘अंघोळीची गोळी’ हा उपक्रम अतिशय प्रभावीपणे राबविला जात आहे. त्याच धर्तीवर येथे ‘खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर’ ही मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. खिळे व त्यावरील फलकामुळे झाडांचे आयुष्यमान कमी होत जातेच, त्याचबरोबर शहराचे विद्रुपीकरण वाढत आहे. यासाठी शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांना आवाहन केल्यानंतर उत्स्फूर्तपणे संस्थांचे प्रतिनिधी आले आहेत. केवळ एक दिवसाचा इव्हेंट न होता, त्या मार्गाची जबाबदारी कायमपणे संबंधितांवर राहणार आहे.
पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड म्हणाले, मंत्री सतेज पाटील यांनी नियोजित केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. शहरात पाच लाख ६७ हजार झाडे आहेत, त्यातील सुमारे एक लाख रस्त्यालगत आहेत. ज्या भागात जास्त खिळे सापडतील, तिथे अधिक लक्ष ठेवता येईल, असे उदय चौगुले यांनी सांगितले.
कायद्याचा धाक दाखवण्याची सूचना अनिल चौगुले यांनी केली. कोल्हापूर जिल्हा हॉटेल चालक संघाचे ५० पदाधिकारी या मोहिमेत सहभागी होतील, असे संघाचे अध्यक्ष आनंद माने यांनी सांगितले. ‘अवनि’च्या अनुराधा भोसले, डॉ. अमर आडके, सारिका बकरे यांनीही चर्चेत सहभाग घेतला. यावेळी विद्यानंद बेडेकर, उज्ज्वल नागेशकर, अमोल बुड्डे, दीपा शिपूरकर, आकाश कोरगावकर, प्रशांत जाधव, आदी उपस्थित होते.
दुर्मीळ झाडांना रंगाचे पट्टे मारावे
खिळे काढत असताना आपणाला शहरातील दुर्मीळ झाडेही पाहावयास मिळणार आहेत. त्यांची नोंद ठेवून त्यांना वेगवेगळ्या रंगांचे पट्टे मारल्यास त्याकडे अधिक लक्ष देता येईल, असे उदय गायकवाड यांनी सांगितले.
फोटो ओळी : ‘खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर’ या माेहिमेच्या तयारीसाठी शनिवारी अजिंक्यतारा येथे आयोजित बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले. (फोटो-२६१२२०२०-कोल-काेल्हापूर ०१)
- राजाराम लोंढे