खोची - दुधगाव बंधाऱ्याच्या पिलरचे दगड निसटू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:22 AM2021-04-12T04:22:23+5:302021-04-12T04:22:23+5:30
आयुब मुल्ला लोकमत न्यूज नेटवर्क खोची : वारणा नदीवर खोची-दुधगावदरम्यान असणाऱ्या बंधाऱ्यांची दुरुस्तीअभावी नाजूक परिस्थिती बनत चालली आहे. ...
आयुब मुल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
खोची : वारणा नदीवर खोची-दुधगावदरम्यान असणाऱ्या बंधाऱ्यांची दुरुस्तीअभावी नाजूक परिस्थिती बनत चालली आहे. पिलरचे दगड निसटत असून, वेळेत त्याची डागडुजी केली नाही तर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थ निवेदन देतात, तक्रार करतात यावर अधिकारी येतात, पाहणी करतात आणि निघून गेल्यानंतर पुढे काहीच होत नाही, अशी अवस्था आहे. लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी लक्ष देऊन ही धोकादायक समस्या ताबडतोब मार्गी लावणे गरजेचे आहे.
पन्नास वर्षांपूर्वी सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी बंधारा बांधण्यात आला. यामुळे शेतीला मुबलक पाणीपुरवठा होऊ लागला. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांना जोडणारा हा बंधारा वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरला. दोन्ही जिल्ह्यांत जाण्या-येण्यासाठी कमी अंतराचा हा मार्ग झाला.
साहजिकच या ठिकाणाहून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली. वर्षानुवर्षे ती वाढतच गेली. महापुराच्या फटक्याने या बंधाऱ्याच्या मजबुतीला धक्का लागत गेला. त्यातच अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. क्षमतेपेक्षा ओझे वाढू लागल्याने बंधाऱ्याचे पिलर कमकुवत होत आहेत.
पिलरचे दगड खालच्या भागातून निसटून पडू लागले आहेत. बाजूला असणारा भरावही ढासळत आहे. तीन वर्षांपूर्वी अवजड वाहतूक बंद करण्यासाठी पाटबंधारे विभागाने बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने लोखंडी कमान उभी केली; पण वाहतूक सुरूच ठेवण्यासाठी त्या कमानीचे खांब काढून नदीत टाकून दिले. त्यामुळे मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू आहे.
या वाहतुकीच्या रेट्यात बंधारा मात्र ओझं सहन न व्हावे अशा अवस्थेत सापडला आहे. वेळेत याची दुरुस्ती झाली नाही तर मोठा अपघात होऊन अनर्थ होऊ शकतो, अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यापूर्वी हे काम हातात घेणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.
चौकट-१) गेल्या आठवड्यात दुधगाव येथील युवक पोहण्यासाठी येथे आला होता. त्याने हातात प्लास्टिक कॅन घेऊन बंधाऱ्यावरून नदीत उडी मारली. दुर्दैवाने कॅन हातातून निसटल्याने तो बुडाला. पिलरच्या निसटलेल्या दगडाच्या ठिकाणी तो अडकला. त्याचा मृतदेह काढण्यासाठी तीन दिवस प्रयत्न करावे लागले.
यावरून किती भयावह व धोकादायक अवस्था या पिलरची झाली आहे हे लक्षात येते.
२) हा बंधारा वाहतूक वाढल्यामुळे धोकादायक बनला आहे. पिलरचे दगड निखळू लागले आहेत. शेजारीच सुरू असलेल्या नवीन पुलाचे काम पूर्ण होण्यास अजून अवधी आहे. बंधारा दुरुस्त करावा यासाठी संबंधित विभागाला कळविले आहे. लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
अमरसिंह पाटील-माजी उपसरपंच, खोची.
फोटो ओळी-वारणा नदीवर असणाऱ्या खोची-दुधगाव बंधाऱ्याच्या पिलरचे दगड निखळू लागल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.