खोची बालिका खून प्रकरण: न्यायालयाचा फैसला, आरोपीस तिहेरी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 11:58 AM2022-05-02T11:58:35+5:302022-05-02T12:02:28+5:30
कोल्हापूर : खोची (ता. हातकणंगले) येथील सहा वर्षांच्या बालिकेचे अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिची निर्घृणपणे हत्या प्रकरणी ...
कोल्हापूर : खोची (ता. हातकणंगले) येथील सहा वर्षांच्या बालिकेचे अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिची निर्घृणपणे हत्या प्रकरणी न्यायालयाने आज, सोमवारी निकाल दिला. न्यायालयाने आरोपी बंडा ऊर्फ प्रदीप दिलीप पोवार (वय ३०, रा. खोची) या नराधमाला तिहेरी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा व सत्रन्यायाधीश वृषाली जोशी यांनी ही शिक्षा सुनावली. पश्चिम महाराष्ट्रासह जिल्ह्याचे या निकालाकडे लक्ष लागून होते.
नात्याला कलंक लावणारी घटना असल्याने आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव - पाटील यांनी केली होती. खटल्याचा निकाल आज, सोमवारी सुनावण्यात आला. या खटल्यात एकूण २८ साक्षीदार तपासले. आज या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर खोची परिसरातील ग्रामस्थांनी न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती.
दि. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी खोची येथील सहा वर्षांच्या बालिकेचे घरातून अपहरण करून गावातच निर्जनस्थळी तिच्यावर लैगिक अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या केल्याचा आरोप बंडा ऊउर्फ प्रदीप पोवार याच्यावर होता. न्यायालयाने आरोपी पोवारला सर्व खटल्यात दोषी ठरवले.
२२५ पानांचे दोषारोपपत्र
घटनेनंतर महिन्यातच वडगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक संतोष घोळवे यांनी सखोलपणे तपास करून २२५ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. मार्चपासून अवघ्या १२ कामकाजाच्या सुनावणीत खटल्याचे कामकाज पूर्ण केले. खटल्यात चार साक्षीदार, पंच, घटनास्थळाचा पंचनामा, शवविवच्छेदन अहवाल, आरोपीने कलम २७ खाली दिलेली माहिती, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल तसेच वस्तुनिष्ठ पुरावे न्यायालयात सादर केले.
घटनाक्रम...
- ३१ ऑक्टोबर २०२१ - भर दिवसा बालिकेचे अपहरण, लैंगिक अत्याचार, हत्या
- ३१ ऑक्टोबर - सायंकाळी बालिकेचा मृतदेह मिळाला
- १ नोव्हेंबर - पहाटे आरोपी बंडा ऊर्फ प्रदीप दिलीप पोवार याला अटक
- ४ डिसेंबर - आरोपीविरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
- १७ मार्च २०२२ - मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती.
- २२ मार्च - खटल्याची सुनावणी सुरू.
- २८ मार्च - आरोपीला न्यायालयाने ठरवले दोषी.