खोची बालिका खून प्रकरण: क्रौर्यापुढे वडिलकीचे नातेही थिजले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 11:28 AM2022-04-29T11:28:38+5:302022-04-29T14:19:03+5:30
काका हे नातं वडिलांसमान असतं, पण खोचीतील (ता. हातकणंगले) बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची क्रूरपणे केलेली हत्या ही या नात्याला कलंक लावणारी घटना ठरली अन् नातं कौर्यापुढे थिजलं.
तानाजी पोवार
कोल्हापूर : काका हे नातं वडिलांसमान असतं, पण खोचीतील (ता. हातकणंगले) बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची क्रूरपणे केलेली हत्या ही या नात्याला कलंक लावणारी घटना ठरली अन् नातं क्रौर्यापुढे थिजलं. दि. ३१ ऑक्टोबर रोजी ही घटना घडल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच न्यायालयाच्या अवघ्या १२ कामकाजांमध्ये आरोपीविरुद्धचा खटला पूर्ण होऊन त्याला शिक्षेला सामोरे जावे लागले.
आरोपी बंडा उर्फ प्रदीप पोवार याची त्याच गावातील बालिकेच्या वडिलांशी मैत्री होती, त्याची त्यांच्या घरी ये-जा होती. बालिका त्याला काका म्हणायची. दि. ३१ ऑक्टोबर २०२१ला याच काकाने तिचा घात केला. सकाळी आरोपी खेळण्याचे निमित्त काढून तिला घरातून घेऊन गेला. तासभर गावातील भैरवनाथ मार्गावर टेहाळणी केली. गावातील चार महिलांनी त्याच्यासोबत बालिकेला अखेरचे पाहिले. दुपारी १२.४५ वाजता तो गोंधळलेल्या अवस्थेत जाताना एका साक्षीदाराला दिसला. त्यानंतर तो घरी जाऊन निवांतपणे झोपला.
दुपारी बालिका घरी नसल्याने शोधाशोध केली. तरुणांनी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यावेळी चौकशी करताना चौघा साक्षीदारांनी आरोपीसोबत बालिकेला पाहिल्याचे सांगितले. बालिकेच्या आईने आरोपीच्या घरी जाऊन चौकशी केली, त्यावेळी आरोपीने माहिती नसल्याबाबत कानावर हात ठेवले. सायंकाळी ५ वाजता बालिकेचा मृतदेह निर्जनस्थळी मिळाला. तिच्या नाकातोंडातून रक्त येत होते, मानेवर व गुडघ्यावर खरचटलेल्या जखमा होत्या. पोलीसही घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पंचनामा केला. तेथे केस, माती, गुटख्याची पाकिटे मिळाली, ती पोलिसांनी ताब्यात घेतली. मृतदेह सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यानंतर बालिकेवर लैंगिक अत्याचार व खून झाल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी संशयावरून दुसऱ्या दिवशी पहाटे आरोपी बंडू पोवारला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत घरातील माळ्यावर लपवलेले घटनेवेळचे कपडे काढून दिले. त्यापैकी जीन्स पॅंटवर घटनास्थळाची माती तर टी-शर्टवर रक्ताचे डाग आढळले. चपलांना लागलेली माती व पाला हा घटनास्थळाचा तसेच रक्ताचे डाग बालिकेचे व केस हे त्याचेच असल्याचे फॉरेन्सिक लॅबमध्ये स्पष्ट झाले. याचा तपास करून अवघ्या महिनाभरात वडगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक संतोष घोळवे यांनी आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केेले. त्यानुसार खटला चालून सोमवारी निकाल दिला आहे.