दख्खनचा राजा जोतिबाची पाकळ्यातील खडी पूजा, भाविकांची अलोट गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 05:52 PM2017-09-24T17:52:27+5:302017-09-24T18:26:01+5:30
कोल्हापूर- दख्खनचा राजा जोतिबाची आज पाच पाकळ्यातील खडी पूजा बांधण्यात आली आहे.
कोल्हापूर- दख्खनचा राजा जोतिबाची आज पाच पाकळ्यातील खडी पूजा बांधण्यात आली आहे. आज रविवार असल्याने जोतिबा डोंगरावर भाविकांची गर्दी उसळली होती. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या तीन राज्यांतील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या जोतिबा यात्रेला कामदा एकादशीपासून सुरुवात होते. नवरात्रीतही जोतिबाची पूजा बांधण्यात येते. जोतिबाच्या यात्रा काळात डोंगरावर असंख्य भाविकांची गर्दी असते.
यात्रेआधीच भाविकांची डोंगरावरील ये-जा दिसू लागली आहे. जोतिबा डोंगराच्या दिशेने जाताना घाटात काही ठिकाणी स्वयंसेवक भाविकांच्या सेवेसाठी छत उभारणीच्या कामात व्यस्त असतात. डोंगरावर तलावाच्या सभोवतलाच्या परिसरात पार्किंगचे नियोजन असते. काही ठिकाणी एस. टी.सह अन्य मोठ्या वाहनांसाठी सपाटीकरण करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून डोंगरी विकास कार्यक्रम आणि दत्तक ग्राम योजनेतून रस्ता रुंदीकरण - डांबरीकरणाचे कामही झाले आहे. याचबरोबर मंदिरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरणही सुरू होते. या मार्गावर दोन्ही बाजूला दुकानांसाठी छत उभारणी केली जात होती.
शिवाय मंदिर परिसरात दर्शन रांगांसाठी बॅरिकेटिंग आणि दर्शनासाठी ब्रीजची व्यवस्था केली जात असल्याचे दिसले. दुसरीकडे मंदिराच्या आवारातील उखडलेल्या फरशांमध्ये सिमेंट भरून त्याची दुरूस्ती केली जात होती. काही दुकानदारांकडून साहित्याची मांडणी सुरू होती. काही दुकानदार गुलालाची पोती आणताना दिसले. चैत्र यात्रेनिमित्त नारळ, गुलाल-खोबरे, मेवा मिठाईचे व्यापारी डोंगरावर दाखल झाले आहेत. केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात नारळाचे ट्रकही डोंगरावर दाखल झाले आहेत. मंदिरात देवाचे दागिने, चांदीचे प्रभावळ स्वच्छ करण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. दरवर्षी डोंगरावर यात्रा काळात भाविकांची संख्या वाढते. गेल्या वर्षी काहीशी दुष्काळाची स्थिती असल्याने भाविकांची संख्या चार लाखांपर्यंतच होती. यंदा मात्र ५ लाखांहून अधिक भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाचा आहे.