इचलकरंजीत यंत्रमागधारकांचा किल्ली मोर्चा

By admin | Published: December 24, 2016 01:07 AM2016-12-24T01:07:01+5:302016-12-24T01:07:01+5:30

‘मी स्वाभिमानी कारखानदार’तर्फे आंदोलन : प्रांताधिकाऱ्यांकडे बंद कारखान्यांच्या किल्ल्या सुपूर्द

Kichi Front of Ichalkaranjat Yugramakkha | इचलकरंजीत यंत्रमागधारकांचा किल्ली मोर्चा

इचलकरंजीत यंत्रमागधारकांचा किल्ली मोर्चा

Next

इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगाला ऊर्जितावस्था मिळावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत शुक्रवारी सातव्या दिवशी यंत्रमागधारकांनी कारखाने बंद ठेवून प्रांत कार्यालयावर किल्ली मोर्चा काढला. यावेळी कारखानदारांनी प्रांताधिकाऱ्यांकडे किल्ल्या सुपूर्द करून मागण्यांबाबत त्वरित तोडगा काढण्याची मागणी केली.
गेली दोन वर्षे यंत्रमाग उद्योग अडचणीतून मार्गक्रमण करीत असून, आता हा उद्योग नुकसानीत चालविणे परवडेनासे झाले आहे. त्यामुळे या उद्योगाकडे शासनाचे लक्ष वेधून प्रलंबित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी ‘मी स्वाभिमानी कारखानदार’ या संघटनेच्यावतीने संतोष कोळी ऊर्फ बाळ महाराज व अमोद म्हेत्तर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
गेले सहा दिवस सुरू असलेल्या या आंदोलनाची दिवसेंदिवस तीव्रता वाढत असून, सातव्या दिवशी कारखानदारांनी कारखाने बंद ठेवून प्रांत कार्यालयावर किल्ली मोर्चा काढला. घोषणाबाजी करीत गांधी पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा मुख्य मार्गावरूनप्रांत कार्यालयावर आला. या ठिकाणी कारखानदारांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.
यावेळी सर्व कारखानदार प्रांत कार्यालयात जाण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अडविले. अखेर शिष्टमंडळाने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची भेट घेऊन बंद कारखान्यांच्या किल्ल्या सुपूर्द केल्या आणि मागण्यांबाबत चर्चा केली. यावेळी आबा जाधव आणि बाळकृष्ण लवटे यांनी यंत्रमाग उद्योगाची सद्य:स्थिती बिकट असल्याने किमान स्थानिक स्तरावरील खर्चीवाल्यांच्या मजुुरीचा प्रश्न प्रांताधिकाऱ्यांनी सोडवावा आणि सूत दर स्थिर ठेवणे, विजेच्या दरात सवलत, कर्जाचे व्याज अनुदान याप्रश्नी सरकारला त्वरित निर्णय घेण्याबाबत कळविण्याची मागणी केली.
यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी ट्रेडिंंगवाले आणि खर्चीवाल्यांची संयुक्त बैठक घेऊन त्यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात विकास चौगुले, प्रकाश म्हेत्रे, संदीप माने, जर्नादन चौगुले, भरत कचरे, सुरेश शिंंदे, आदींचा समावेश होता. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रांत कार्यालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, प्रांताधिकारी शिंगटे यांनी आंदोलकांच्या विनंतीला मान देत आंदोलनस्थळी बाळ महाराज यांची भेट घेऊन मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)


रिक्षा संघटनांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
यंत्रमाग व्यवसायाच्या प्रमुख मागण्यांसाठी सात दिवसांपासून सुरूअसलेल्या आंदोलनाचा परिणाम यंत्रमाग कामगारांसह छोटे व्यावसायिक, रिक्षा व्यावसायिक, हॉटेल, किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते, व्यापारी, आदींसह सर्वसामान्यांवर होऊ लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच ट्रेडिंग असोसिएशन, खर्चीवाले यंत्रमागधारक प्रतिनिधींसह आजी-माजी आमदार व खासदार यांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी शहरातील महाराष्ट्र रिक्षाचालक संघटना, इंदिरा आॅटो रिक्षा युनियन व विद्यार्थी वाहतूक संघटना यांच्यावतीने प्रांताधिकारी शिंंगटे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी लियाकत गोलंदाज, दशरथ मोहिते, मन्सुर सावनूरकर, अशोकराव कोलप, श्रीमती नंदा साळुंखे, रामचंद्र कचरे, शिवाजी साळुंखे, रामचंद्र जाधव, राजू शिसुदे, बाळू खाडे, बाळासाहेब जाधव, आदी उपस्थित होते.
ट्रेडिंगधारकांच्या दारात धरणे आंदोलन
ट्रेडिंगधारक खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीबाबत चर्चेला तयार नसतील तर आज, शनिवारपासून त्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा उपोषणकर्ते संतोष कोळी ऊर्फ बाळ महाराज यांनी शुक्रवारच्या सभेत दिला. तसेच सूत व्यापारी यांच्या सुताच्या गोडावूनवर छापे टाकण्याच्या मागणीचेही निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

Web Title: Kichi Front of Ichalkaranjat Yugramakkha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.