Kolhapur: वीस लाखांसाठी मित्राचे अपहरण, तिघांना अटक; अज्ञात चौघांचा कसून शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 12:47 PM2024-09-27T12:47:01+5:302024-09-27T12:47:15+5:30
गडहिंग्लज : जेवायला जाण्याच्या बहाण्याने कारगाडीतून मित्राचे अपहरण करून चार तोळ्यांची सोनसाखळी व दीड तोळ्याची अंगठी काढून घेऊन २० ...
गडहिंग्लज : जेवायला जाण्याच्या बहाण्याने कारगाडीतून मित्राचे अपहरण करून चार तोळ्यांची सोनसाखळी व दीड तोळ्याची अंगठी काढून घेऊन २० लाखांची मागणी करून त्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महिलेसह सातजणांविरुद्ध गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
त्यापैकी अटकेतील ओंकार दिनकर गायकवाड (रा. हणमंतवाडी, ता. गडहिंग्लज) सुनीता ऊर्फ शनया प्रकाश पाटील (बाळेघोळ, ता. कागल) वीरेंद्र संजय जाधव (मूळ रा. राशिंग, ता. हुक्केरी, सध्या हाळलक्ष्मी, वडरगे रोड, गडहिंग्लज) यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिला आहे. अन्य अज्ञात चौघांचा पोलिस कसून शोध घेत आहेत.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, योगेश हरी साळुंखे (वय ३४, मूळ गाव हसूर खुर्द, ता. कागल, सध्या रा. गर्देनगर, वडरगे रोड, गडहिंग्लज) आणि कागल तालुक्यातील बाळेघोळ येथील ओंकार व सुनीता हे एकमेकांचे मित्र आहेत. सोमवारी (२३) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ओंकार व सुनीता यांनी जेवायला जाऊया असे सांगून योगेशला येथील भडगाव रोडवरील ड्रायव्हिंग स्कूलजवळून त्याच्याच कारमधून घेऊन नेले. तिघेही तवंदी रोडवरील बहिरेवाडी हद्दीतील एका हॉटेलमध्ये जेवायला गेले. त्या ठिकाणी पोहोचताच 'वॉशरूम'ला जाऊन येतो असे सांगून ओंकार व सुनीता हे दोघेही हॉटेलच्या पाठीमागे गेले.
हॉटेलसमोर आलेल्या अज्ञात पाचजणांनी योगेशला त्याच्याच कारमध्ये (एमएच- ४६ पी ६४३५) घालून त्याला गोकुळ शिरगावला नेले. दरम्यान, कमरपट्ट्याने मारहाण करून त्याच्या गळ्यातील चार तोळ्यांची सोनसाखळी व हातातील दीड तोळ्याची अंगठी काढून घेतली. २० लाख रुपये दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. योगेश साळुंखे यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक गजानन सरगर अधिक तपास करीत आहेत.
'गोकुळ शिरगाव'मध्ये सुटका
दरम्यान, योगेशने मोबाइलवरून पत्नीला या प्रकाराची माहिती दिली. त्यामुळे त्या फिर्याद देण्यासाठी गडहिंग्लज पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यावरून गडहिंग्लज पोलिसांनी संशयितांच्या मोबाइलचे लोकेशन काढून गोकुळ शिरगाव पोलिसांच्या सहकार्याने योगेशची सुटका केली. सुनीता हिच्यासह पळून गेलेला ओंकार व मुख्य आरोपी वीरेंद्रलाही पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.