तरुणीचे अपहरण; गुन्हा ‘मिसिंग’चा

By admin | Published: May 14, 2016 01:24 AM2016-05-14T01:24:12+5:302016-05-14T01:24:12+5:30

कोल्हापुरातही ‘सैराट’ : आर्थिक हितसंबंधांतून तपासाकडे दुर्लक्षाची तक्रार

Kidnapping; The crime 'Missing' | तरुणीचे अपहरण; गुन्हा ‘मिसिंग’चा

तरुणीचे अपहरण; गुन्हा ‘मिसिंग’चा

Next

विश्वास पाटील / कोल्हापूर
मुलगा मातंग समाजातला. मुलगी उच्च जातीतली. त्यांचे आठवीपासून प्रेम. जानेवारीत नोंदणी पद्धतीने लग्न झाले. मुलीच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नसल्याने त्यांनी मुलीचे अपहरण केले असून तिचीही स्थिती ‘सैराट’ चित्रपटातील आर्चीसारखी होईल, अशी भीती मुलाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
यासंबंधी त्यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी सोमवारी (दि. ९ मे) रोजी तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार नोंद करून घेतली आहे. आर्थिक दबावातून पोलिस या गंभीर प्रकरणाचा तपास करत नसल्याची तक्रार मुलाच्या कुटुंबीयांनी अप्पर पोलिस अधीक्षक एस. चैतन्या यांना भेटून केली आहे. या मुलीस कुटुंबीयांनी राजस्थानला नेऊन ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
जे घडले ते फारच गंभीर आहे. पोलिस खाते एखाद्या संवेदनशील प्रकरणातही किती बेफिकीर असते याचा दाखला देणारे आहे. हा मुलगा मूळचा राजारामपुरीत राहणारा. सर्वसामान्य कुटुंबातला. मुलगी न्यू पॅलेस परिसरात (पान १ वरून) राहणारी. जातीय व आर्थिकदृष्ट्याही उच्च स्तरातली. दोघेही आयर्विन ख्रिश्चनमध्ये शाळेत होते. आठवीत असल्यापासून त्यांचे प्रेम. त्यास मुलीच्या कुटुंबीयांकडून विरोध होता. शेवटी त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. दि. १३ जानेवारी २०१६ ला त्यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केले. लग्नानंतरही मुलगी काही दिवस आईच्या घरी राहत होती. त्या दरम्यान त्यांच्याकडून दुसऱ्या लग्नाचा दबाव वाढल्याने या नवदाम्पत्याने दि. १५ एप्रिल २०१६ ला घर सोडले. मुलगी बेपत्ता झाल्याचे समजताच तिच्या पालकांनी दि. १६ एप्रिलला लगेच शाहूपुरी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी दोघांनाही पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. त्यावेळीही तिथे या मुलीस तिच्या आई व बहिणीकडून पोलिस ठाण्यातच मारहाण झाली; परंतु पोलिसांनी जाब-जबाब घेतला व लग्नाचे नोंदणी प्रमाणपत्र पाहून सोडून दिले. त्यानंतर हा मुलगा संभाजीनगर परिसरातील ओम गणेश कॉलनीत राहू लागला. दरम्यानच्या काळात मुलीच्या घरातून तिला फोन आला. तुझ्या आईस पक्षाघाताचा झटका आला आहे व तातडीने बघायला ये, असा निरोप देण्यात आला. ती मुलगी तिथे गेल्यावर तिच्याकडून ती वापरत असलेला मोबाईल नंबर घेण्यात आला. आईला बघून ती मुलगी नवऱ्याच्या घरी गेली त्यानंतर तिच्या मोबाईलवर रोज धमकीचे फोन सुरू झाले,त्यास ती वैतागली. काही दिवस असेच गेल्यावर सोमवारी (दि. ९ मे) दुपारी तीनच्या सुमारास संबंधित मुलगा आपल्या आजोळी राजारामपुरीत गेला असताना दोन-तीन अनोळखी स्त्रिया येऊन या मुलीस घेऊन गेल्या. त्यानंतर हा मुलगा तिचा शोध घेण्यासाठी मुलीच्या घरी गेला असता त्याला त्यांनी धक्काबुक्की करून बाहेर काढले.
या घटनेनंतर त्याने थेट जुना राजवाडा पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली व पत्नीच्या अपहरणाची तक्रार नोंदवून घ्या, अशी विनंती पोलिसांना केली. परंतु तिथे ड्युटीवर असलेल्या ‘सुतार’ नावाच्या कॉन्स्टेबलने काही कायदेशीर बाबींमुळे अपहरणाची तक्रार दाखल करून घेता येणार नाही. तुमच्या समाधानासाठी मिसिंगची तक्रार घेतो, असे सांगितले व फिर्यादीची अपहरणाची तक्रार असताना मिसिंगची तक्रार नोंदवून घेतली. या मुलाचे कुटुंबीय फारच आग्रह करू लागल्यावर सुतार दोन कॉन्स्टेबल घेऊन मुलीच्या न्यू पॅलेसमधील घरी गेले तेथून आल्यावर या प्रकरणाचा तपास ठप्पच झाल्याची तक्रार आहे. तपास अधिकारी असलेले सुतार दोन दिवस रजेवरच गेले.
शेवटी संबंधित तरुणाने बुधवारी (दि. ११) सकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस. चैतन्या यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यामध्ये हा प्रकार ‘आॅनर किलिंग’चा असल्याची भीती व्यक्त केली आहे. त्यांनीही त्याची दखल घेतली व तातडीने पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांना फोनवरून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले; परंतु तोपर्यंत दुसऱ्याच दिवशी चैतन्या यांची बदली झाल्याने हे प्रकरण ‘जैसे थे’ राहिले.
————-

—————
हक्कसोडपत्र
आपल्यास संपत्तीसाठी त्रास होऊ नये म्हणून संबंधित मुलीने कसबा बावडा न्यायालयात जाऊन हक्कसोडपत्रही करून दिले आहे.
———————————
५० लाखांचे आमिष
मुलीच्या नातेवाईकांनी या मुलास तू आमच्या मुलीस सोड तुला ५० लाख रुपये आम्ही देतो, असे आमिष दाखविले; परंतु त्याने हे आमिष धुडकावून लावले. त्यामुळे तेच नातेवाईक आता आम्ही तुला देणार होतो तेच पैसे पोलिसांना देऊन मुलीला घरी घेऊन जातो, असे उघड-उघड म्हणत असल्याची तक्रार या मुलाच्या नातेवाईकांनी केली आहे.
———————————

————————
गुरुवारी वादावादी
मुलाच्या कुटुंबीयांनी मुलीशी संबंधित एका नातेवाईकाची माहिती दिली असतानाही पोलिसांनी त्याच्याकडून जुजबी माहिती घेत त्यास लगेच सोडून दिल्याने मुलाकडील लोकांना त्याचा राग आला. त्यांनी पोलिसांना धारेवर धरले. त्यामुळे गुरुवारी (दि. १२) रात्री नऊच्या सुमारास पोलिस ठाण्यासमोरच जोरदार वाद झाला.
———————-
 

Web Title: Kidnapping; The crime 'Missing'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.