गुंड समीरचे आष्ट्यात अपहरण
By admin | Published: October 5, 2015 01:05 AM2015-10-05T01:05:46+5:302015-10-05T01:08:22+5:30
पूर्ववैमनस्यातून पाचजणांचे कृत्य : खुनी हल्ला करून पळविले
आष्टा : येथील गुंड समीर मुस्तफा सय्यद ऊर्फ नायकवडी (वय २४, रा. वडगाव, जि. कोल्हापूर) याच्यावर पूर्ववैमनस्यातून पाचजणांनी धारदार शस्त्राने खुनीहल्ला केला. हल्ल्यानंतर गंभीर अवस्थेत मोटारसायकलवर बसवून त्याचे अपहरण केले. ही घटना आष्टा येथील गणपती मंदिरानजीक परीट गल्ली येथे शनिवारी रात्री पावणेदहाच्या दरम्यान घडली. आष्टा पोलिसात अमित सुरेश खंडागळे यांनी फिर्याद दिली आहे.आष्टा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समीर नायकवडी याच्यावर खंडणी, बेकायदा हत्यार बाळगणे, मुलींची छेडछाड, मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. तो आष्टा येथे राहत होता. सध्या तो वडगाव येथे वास्तव्यास आहे. अमित खंडागळे (रा. बिरोबा मंदिराजवळ, आष्टा) याच्याशी गेल्या ३ वर्षांपासून त्याची मैत्री आहे. डिसेंबर २०१३ मध्ये संग्राम मोरे, लखन हाबळे, शहेनशहा मुजावर, आकाश पवार यांनी एका मुलीच्या प्रकरणावरून नायकवडी यास मारहाण केली होती. फेबु्रवारी २०१४ मध्ये समीर यास मारहाण का केली, म्हणून विचारणा करतेवेळी जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर समीरचे या लोकांशी कायमचे वितुष्ट आले.
शनिवारी सायंकाळी सातच्या दरम्यान समीर आष्टा येथे आला. अमित खंडागळे व समीर येथील एका पेट्रोल पंपानजीक चायनीज खात असताना, आश्रफ देसाई (रा. रामनगर, आष्टा) तेथे आला. त्याने समीरला शिवीगाळ केली. त्यानंतर समीरने त्याच्या श्रीमुखात लगावली. तेथून आश्रफ निघून गेला. समीरही निघून गेला. अमित तिथेच थांबला. हातगाडी विक्रेता सचिन रासकर याने, संग्राम मोरे व आकाश पवार यांच्यासह इतर मुले तुम्हास मारण्यासाठी शोधत आहेत, तुम्ही निघून जा, असे अमितला सांगितले. रात्री साडेनऊच्या दरम्यान जाणता राजा हॉटेलसमोर समीर नायकवडी व अमितची भेट झाली. अमितने माहिती समीरला दिली. त्यानंतर समीर त्यांना जाब विचारण्यासाठी निघून गेला. समीर गणपती मंदिरानजीक गेला. त्याचठिकाणी त्याच्यावर धारदार हत्याराने संग्राम मोरे, शहेनशहा मुजावर, आकाश पवार, आकाश वर्णे, धवल वग्याणी यांनी वार केले. तसेच दगडाने मारहाण केली. समीरला ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी अवस्थेत त्याला मोटारसायकलवर बसवून गणपती मंदिर, यल्लम्मादेवी रस्त्याने पळवून नेले. आष्टा पोलिसांना रात्री ११ च्या दरम्यान माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक पी. डी. पोमण, पोलीस उपनिरीक्षक जहॉँगीर शेख घटनास्थळी भेट दिली. समीरचा यल्लम्मादेवी रस्त्यासह शहर परिसरात शोध घेतला. सांगली, कोल्हापूर जिल्ह्णातील सर्व रुग्णालयांमध्ये चौकशी केली, कुठेही समीरवर उपचार सुरू असल्याचे समजले नाही. अमित खंडागळे याने, समीर यास धारदार शस्त्राने व दगडाने मारहाण करून गंभीर अवस्थेत वरील व्यक्तींनी मोटारसायकलवरून त्याला पळवून नेल्याची आष्टा पोलिसात वर्दी दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जहॉँगीर शेख करीत आहेत. (प्रतिनिधी)
धागेदोरे नाहीत...
आष्टा शहरात दिवसभर समीरचा खून झाल्याची जोरदार चर्चा होती. पोलिसांच्या श्वानपथकानेही तपास घेतला. मात्र, ते गणपती मंदिर परिसरातच घुटमळल्याने, अद्याप धागेदोरे हाती लागलेले नाहीत.