खासगी सावकारीतून दोघांचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 04:53 AM2019-09-18T04:53:03+5:302019-09-18T04:53:06+5:30
सलून व्यावसायिक व त्याच्या मित्रास जबरदस्तीने मोटारीत घालून त्यांचे अपहरण करण्याची तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याची घटना मंगळवारी पहाटे घडली.
कोल्हापूर : खासगी सावकारकीतून कर्जाची वसुली करण्यासाठी सलून व्यावसायिक व त्याच्या मित्रास जबरदस्तीने मोटारीत घालून त्यांचे अपहरण करण्याची तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. याबाबत प्रदीप प्रकाश संकपाळ (वय २९, रा. जनाई दत्तनगर, कळंबा, कोल्हापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून खासगी सावकार रोहित भाले याच्यासह सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदीप संकपाळ यांनी सलून व्यवसायासाठी रोहित भालेकडून खासगी सावकारीतून एक लाख ४० हजार रुपये घेतले होते. मूळ रक्कम व त्यावर एक लाख व्याज देण्याबाबत खासगी सावकार रोहित भाले याने संकपाळकडे तगादा लावला होता. सोमवारी रात्री भालेने संकपाळ व त्याचा मित्र प्रशांत या दोघांना फोन करून संभाजीनगर येथील शाळेजवळ बोलावून घेतले. त्यावेळी दिलेले एक लाख ४० हजार रुपये व त्यावरील एक लाख रुपये व्याज असे सुमारे दोन लाख ४० हजार रुपये दोघांनी आजच्या आज द्यावेत, अशी मागणी केली. त्यानंतर या दोघांनाही त्यांनी मित्रांच्या सहकार्याने जबरदस्तीने मोटारीत घालून कळंबा, इस्पुर्लीमार्गे मुदाळ तिट्टामार्गे आदमापूर येथे नेले. मध्यरात्री तेथे मोटार रस्त्याच्या कडेला थांबवून संकपाळ आणि प्रशांत या दोघांनाही भाले व त्याच्या तिघा मित्रांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर दोघांनाही मोटारीतून कागलमार्गे, लक्ष्मी टेकडीमार्गे पहाटे अडीचच्या सुमारास तावडे हॉटेल चौकात आणून सोडले.