तरुणाईमुळे ‘किफ्फ’ हाऊसफुल्ल
By admin | Published: December 24, 2016 01:04 AM2016-12-24T01:04:01+5:302016-12-24T01:04:01+5:30
चित्रपट महोत्सव : दुसऱ्या दिवशी तेरा चित्रपट, दहा लघुपटांचे सादरीकरण
कोल्हापूर : जगभरातील विविध भाषांमधील कलाकृतींचा समावेश असलेल्या पाचव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (किफ्फ) तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी ‘किफ्फ’ हाऊसफुल्ल ठरला.
राजर्षी शाहू स्मारक येथे सुरू असलेल्या या महोत्सवात दिवसभरात विविध भाषांमधील तेरा चित्रपट व दहा लघुपटांचे सादरीकरण झाले.
सनसनाटी, राजकीय हत्या आणि अध्यात्म या विषयांना अग्रभागी ठेवून मनू या नायकाचं भावविश्व गुंफण्यात आलेल्या, डॉ. सिद्धार्थ सिवा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘एआयएन’ या मल्याळम चित्रपटाने दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली. त्यानंतर इराणच्या चालीरीतींचा काटेकोर अवलंब करणाऱ्या एका कुटुंबावर आधारित ‘ए क्युब आॅफ शुगर’ हा सिनेमा दाखविण्यात आला. दिवसभरात जलाल्स स्टोरी, २००१ : ए स्पेस ओडिसी, कादंबरी, हरिकथा प्रसंग, ए क्लॉकवाइज आॅरेंज, आदी चित्रपट दाखविण्यात आले.
निसर्ग आणि माणूस यांच्यातील अद्वैत राखणारा आणि निसर्गाबद्दल विलक्षण अनुभूती देणाऱ्या एकाच व्यक्तीवर आधारलेला विजय दत्त दिग्दर्शित ‘माचीवरला बुधा’ हा ‘किफ्फ’चे आकर्षण ठरला. हा चित्रपट म्हणजे पशुपक्षी आणि निसर्ग यांच्या अतूट नात्यांची गुंफण असून, त्यामध्ये शहरातील बुधा माचीवरच्या जंगलात जाऊन निसर्गाची एकरूप होताना दिसतो. निसर्गामुळेच बुधाला खऱ्या जीवनाचा अर्थ कळतो. सर्वच अंगांनी परिपूर्ण असलेला हा चित्रपट म्हणजे ‘गो. नी.’ यांच्या अप्रतिम निसर्गप्रेमाची संकल्पना प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होता.
सायंकाळच्या सत्रात महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित रिचर्ड अॅटनबरो यांनी १९८२ मध्ये दिग्दर्शित केलेला ‘गांधी’ हा चित्रपट दाखविण्यात आला. त्यासह दिग्दर्शक बिजूकुमार दामोदरन यांचा ‘वलिया चिरकुल्ला पक्षीकाल’, दिग्दर्शक शाजी करुण यांचा ‘कुट्टी स्पारंक’, दिग्दर्शक माझीयर मिरी यांचा ‘द पेंटिंग पुल’ हा इराणी चित्रपट दाखविण्यात आला.
दरम्यान, ज्ञानेश्वर मुळे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा धनंजय भावलेकर दिग्दर्शित ‘जिप्सी’ हा माहितीपट तरुणाईचे आकर्षण ठरला. अब्दुललाटसारख्या एका छोट्या खेडेगावापासून सुरू झालेला हा प्रवास जपान, रशिया, सीरिया, अमेरिका अशा देशविदेशांची सैर घडवून आणतो. मुळे यांचा हा थक्क करणारा प्रवास पाहून उपस्थित भारावले. त्यानंतर पंडित तुलसीराम बोरकर यांचा सांगीतिक जीवनप्रवास दाखविणारा ‘संवादिनी साधक’ हा माहितीपट दाखविण्यात आला. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या तणावावर आधारित अभय कुमार दिग्दर्शित ‘प्लेसबो’ने सर्वांना विचार क रण्यास भाग पाडले. त्यानंतर औषध, आफ्टरग्लो, सोलो फिनाले, छाया, प्लेसबो, आदी लघुपट दाखविले. (प्रतिनिधी)
महोत्सवात आज
स्क्रीन १ : सकाळी ९.३० वा. - वानप्रस्थम (मल्याळम), दुपारी १२ वा. - कत्यन (पोलंड), दुपारी २.३० वा. - द पेंटिंग पुल (इराक), सायंकाळी ६.३० वा. - ब्रेव्ह हार्ट (मराठी), रात्री ९ वा. - बाबासाहेब आंबेडकर (हिंदी).
स्क्रीन २ : सकाळी ९.३० वा.- द हेड हंटर (अरुणाचली), दुपारी १२ वा.- कुड धिस बी लव्ह? (फ्रान्स), दुपारी २.३० वा. - लाईफ फिल्स गुड (पोलंड), सायंकाळी ६.३० वा.- द इटालियन (रशिया), रात्री ९ वा. - स्टॅन्ली कुब्रिक : ए लाईफ इन पिक्चर (युके).
स्क्रीन ३ : सकाळी ९.३० वा. - नाऊ हिअर इन आफ्रिका (जर्मनी), दुपारी १२ वा.- अंडर कन्स्ट्रक्शन (बांग्लादेशी).