..म्हणून रागातून मित्राला संपवले; कोल्हापुरातील फिरस्त्या मजुराच्या खुनाचे कारण स्पष्ट
By उद्धव गोडसे | Published: December 19, 2023 04:55 PM2023-12-19T16:55:15+5:302023-12-19T16:58:30+5:30
आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी
कोल्हापूर : दारू पिण्यासाठी पाणी आणले नसल्याच्या रागातून फिरस्ता मजूर विनायक विश्वास लोंढे (वय ३४, रा. सदर बाजार, कोल्हापूर) याचा मित्रानेच खून केल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. हल्लेखोर लखन तमाम उर्फ समीर युनूस मणेर (वय ३४, रा. कदमवाडी, कोल्हापूर) याने डोक्यात सोड्याच्या बाटल्या फोडून आणि छातीत लाथा मारून लोंढे याचा खून केला. ही घटना काल, सोमवारी (दि. १८) रात्री साडेआठच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील पादचारी उड्डाण पुलाखाली गिरीश बारजवळ घडली.
मध्यवर्ती बसस्थानक परिसरात घडलेल्या खुनाच्या घटनेबाबत प्रतिभा विजय भोसले (वय ३८, रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक लोंढे हा सोमवारी रात्री त्याच्या काही मित्रांसोबत मध्यवर्ती बसस्थानक परिसरात उघड्यावर मद्यप्राशन करीत बसला होता. त्यावेळी समीर मणेर याने दारू पिण्यासाठी लोंढे याला जवळच्या सोडा-पाण्याच्या गाडीवरून पाणी आणण्यास सांगितले.
लोंढे याने पाणी आणण्यास नकार दिला. याचा राग आल्याने मणेर याने सोड्याच्या बाटल्यांनी लोंढे याला मारहाण केली. तसेच त्याला जमिनीवर पाडून छातीत लाथा मारल्या. यामुळे लोंढे याचा जागीच मृत्यू झाल्याचे तपासात स्पष्ट झाले. घटनास्थळी मणेर याचे दोन मित्र होते. मात्र, त्यांचा मारहाणीत सहभाग नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली. हल्लेखोर मणेर याला न्यायालयात हजर केले असता, त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण अधिक तपास करीत आहेत.