उपमहापौरांच्या पतीवर खुनी हल्ला
By admin | Published: November 3, 2015 12:10 AM2015-11-03T00:10:07+5:302015-11-03T00:23:25+5:30
मतमोजणीनंतर पडसाद : ताराराणी, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री; पोलिसांचा लाठीचार्ज
कोल्हापूर : महापालिका निवडणूक निकालानंतर शहरात महाराणा प्रताप चौक, विचारेमाळ, टाकाळा, सिद्धार्थनगर, लक्षतीर्थ वसाहत, बाबा जरगनगर, नाळे कॉलनी, संभाजीनगर, आदी ठिकाणी भाजप-ताराराणी व राष्ट्रवादीच्या समर्थकांत जोरदार धुमश्चक्री उडाली. यावेळी दगड, विटा भिरकावण्याबरोबरच दुचाकींची तोडफोड करण्यात आली. महाराणा प्रताप चौकात राष्ट्रवादीच्या दोन्ही समर्थकांत झालेल्या राड्यामध्ये आर. के. पोवार गटाच्या कार्यकर्त्यांनी विद्यमान उपमहापौर ज्योत्स्ना पवार-मेढे यांचे पती बाळकृष्ण बापूसो पवार-मेढे यांच्यावर खुनी हल्ला केला. त्यांच्या डोक्यात वीट फोडल्याने ते गंभीर जखमी झाले. वादावादी, हाणामारीमुळे शहरात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करून कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. दिवसभर शहरासह उपनगरांत सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पाटील, भालकर गटांत हाणामारी
टाकाळा खण, माळी कॉलनी प्रभाग क्र. ३८ मधून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अनिल कदम यांची पत्नी अश्विनी, तर भाजपमधून माजी उपमहापौर गजानन भालकर यांच्या सून सविता शशिकांत भालकर या उभ्या होत्या. भालकर विजयी झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. यावेळी एका कार्यकर्त्याने अनिल कदम यांच्या मुलग्याला गुलाल लावल्याने जोरदार वादावादी झाली. भालकर यांच्या कार्यकर्त्यांनी अनिल कदम यांच्या घरावर दगडफेक करीत वाहनांची तोडफोड केली. त्यामध्ये कदम यांचा कार्यकर्ता राहुल मोगरे जखमी झाला. त्यानंतर कदम यांच्या कार्यकर्त्यांनी सेनापती बापट मंडळ परिसरात भालकर यांचे कार्यकर्ते श्रीकांत हिंदुराव बागल यांना मारहाण करीत त्यांच्या डोक्यात काठी मारून जखमी केले. त्याचबरोबर भरत बापूसो बागल यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीमध्ये श्रेया सुरेश बागल ही दोन वर्षांची बालिका जखमी झाली. या हाणामारीची घटना समजताच अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचा फौजफाटा पाहून दोन्हीही गटांच्या कार्यकर्त्यांनी तेथून पळ काढला.
लाटकर समर्थकांना पिटाळून लावले
विचारेमाळ प्रभागातून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांच्या पत्नी अॅड. सूरमंजिरी विजयी झाल्या. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बी लावून जल्लोष करण्यास सुरुवात केली. तेथून हे कार्यकर्ते कदमवाडी येथील लाटकर यांच्या घराकडे जाऊ लागले. यावेळी ताराराणीचे उमेदवार सत्यजित ऊर्फ नाना कदम यांचे कार्यकर्ते संपर्क कार्यालयासमोर उभे होते. यापूर्वी या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्याचे पर्यवसान पुन्हा राड्यामध्ये होऊ नये, याची गंभीर दखल घेत शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी लाटकर समर्थकांना रोखून मिरवणूक काढण्यास विरोध केला. काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी लाठीमार करून त्यांना पिटाळून लावले. त्यामुळे परिसरातील महिलांनी पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहिली. त्यानंतर सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला.
नाईकनवरे कार्यकर्त्यांचा
डॉल्बी पाडला बंद
शाहूपुरी तालीम प्रभागातून ताराराणीचे विद्यमान नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांची सून पूजा या विजयी झाल्या. यावेळी त्यांचे समर्थक बागल चौकातून डॉल्बी लावून जल्लोष करीत गवत मंडई येथे आले. या ठिकाणी शाहूपुरी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखत डॉल्बी बंद पाडला. त्यातून कार्यकर्ते व पोलीस यांच्यात वादावादी झाली.
हुल्लडबाजी करणारे दोघे ताब्यात
राजारामपुरी प्रभाग क्र. ३६ मधून राष्ट्रवादीचे संदीप शिवाजीराव कवाळे विजयी झाल्याने त्यांचे कार्यकर्ते मोटारसायकलच्या पुंगळ्या काढून फिरत जल्लोष करीत होते. यावेळी राजारामपुरी पोलिसांनी महापालिकेचा सफाई कामगार रोहित विलास गणेशाचारी (वय २८, रा. मातंग वसाहत, राजारामपुरी) व रिक्षाचालक सचिन निवृत्ती पोवार (२९, रा. साळोखे पार्क) यांना पोलिसी खाक्या दाखवीत ताब्यात घेतले.
जरगनगरमध्ये ‘युवा मंच’च्या कार्यकर्त्यास मारहाण
रायगड कॉलनी, बाबा जरगनगर प्रभाग क्र. ७८ मधून भाजपच्या गीता श्रीपती गुरव या विजयी झाल्या. त्यामुळे काँग्रेसच्या पराभूत उमेदवार वैभवी संजय जरग यांच्या कार्यकर्त्यांनी मराठा मावळा युवा मंचचे कार्यकर्ते प्रसाद प्रल्हाद इराचे (रा. जरगनगर) यांना ‘तू आम्हाला मदत केली नाहीस,’ असे म्हणून शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. यावेळी कार्यालयाचीही तोडफोड केली. इराचे यांनी या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात संशयित संजय
जरग, अजय जरग यांच्यासह दहा ते पंधरा कार्यकर्त्यांविरोधात फिर्याद दिली.
सिद्धार्थनगरमध्ये तणाव
सिद्धार्थनगर प्रभागातून राष्ट्रवादीचे उमेदवार अफझल कुतुबद्दीन पीरजादे हे विजयी झाले. येथील वीरशैव रुद्रभूमीजवळ अफझल पीरजादे यांच्या नावाचा कट्टा बांधण्यात आला होता. सोमवारी दुपारी काही अज्ञातांनी तो पाडून टाकला. या प्रकाराची माहिती नवनिर्वाचित नगरसेवक पीरजादे यांना समजताच त्यांच्यासह दीडशे कार्यकर्ते एकत्र जमल्याने तणाव पसरला.
मिरवणुकांवर बंदी
महापालिका निवडणूक मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांना शहरासह उपनगरांत मिरवणुका काढण्यास बंदी घातली होती. काही उमेदवारांनी मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला; परंतु तो पोलिसांनी हाणून पाडला.
नाईकनवरे, चव्हाण समर्थकांत दगडफेक
व्हीनस कॉर्नर प्रभागातून शिवसेनेचे राहुल चव्हाण हे विजयी झाले. प्रकाश नाईकनवरे हे पराभूत झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला. दरम्यान, सोमवारी सायंकाळी आठच्या सुमारास शाहूपुरी सहाव्या गल्लीमध्ये चव्हाण समर्थक जल्लोष करीत होते. यावेळी नाईकनवरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर दगडफेक केल्याने गोंधळ उडाला. याची माहिती मिळताच शाहूपुरीचे निरीक्षक अरविंद चौधरी पोलिसांचा फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. यावेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना लाठीमार करून पिटाळून लावले.
स्मिता माने यांची मिरवणूक रोखली
सदर बझार प्रभागातून ताराराणी आघाडीच्या स्मिता मारुती माने विजयी झाल्या. उत्साही कार्यकर्त्यांनी सायंकाळी सहाच्या सुमारास डॉल्बी लावून जल्लोष करण्यास सुरुवात केली. भागातून मिरवणूक काढत विरोधकांच्या घरासमोर जल्लोष करण्यास सुरुवात केली. त्यावेळी नगरसेवक महेश जाधव यांनी शाहूपुरी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मिरवणूक रोखत डॉल्बी बंद केला. त्यानंतर कार्यकर्त्यांची पांगवापांगव करून वातावरण शांत केले.
दोन वर्षांच्या बालिकेसह १७ जखमी
महापालिका निवडणूक निकालानंतर शहरात विविध ठिकाणी झालेल्या दगडफेक व हाणामारीमध्ये दोन वर्षांची बालिका श्रेया सुरेश बागल (रा. टाकाळा) हिच्यासह १७ जण जखमी झाले. बाळकृष्ण बापूसो पवार-मेढे, रामभाऊ धोंडिराम पिंपळे, श्रीरंग पवार-मेढे (सर्व रा. सोमवार पेठ), महेश रामदास यादव, रणजित बाळकृष्ण चव्हाण, सचिन विश्वास वाघमोरे, श्रीकांत हिंदुराव बागल, भरत बापूसो बागल (सर्व रा. टाकाळा), अमर नामदेव गायकवाड, शोभा अनिल कुऱ्हाडे, उषा विनायक कापूसकर,
संतोष धोंडिराम पोवार, प्रवीण राजन शिंदे (सर्व रा. जुनी मोरे कॉलनी), कृष्णात सर्जेराव घाटगे, छाया बाबू दावणे, मालूताई नागेश हुंचाळे (सर्व रा. लक्षतीर्थ वसाहत).
चंद्रकांतदादांचा प्रभाग...
तपोवन प्रभागात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निवासस्थान आहे. पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. गतवेळी तत्कालीन नगरसेवक सुभाष रामुगडे यांना विजयी करण्यात प्रमोद पोवार यांचा मोठा वाटा होता. या वेळेला पाटील यांनी खाडे यांना भाजपचे तिकीट दिले होते; पण विजयी मिरवणुकीनंतर त्यांच्या समर्थकांनी केलेली दगडफेक ही चुकीची असल्याची चर्चा
यावेळी नागरिकांमधून सुरू होती.
संभाजीनगर परिसरात पराभूत उमेदवारांच्या घरावर दगडफेक
कोल्हापूर : तपोवन प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रमोद पोवार यांच्या संभाजीनगर परिसरातील जुईनगर येथील घरावर सोमवारी सायंकाळी दगडफेक झाली. या दगडफेकीत दोन महिलांसह पाचजण जखमी झाले असून, या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
महापालिकेच्या निवडणुकीत तपोवन प्रभागात भाजपचे उमेदवार विजय खाडे हे विजयी झाले; तर प्रमोद पोवार पराभूत झाले. विजयी खाडे समर्थकांनी तपोवन प्रभागातून दुचाकी रॅली काढली. ही रॅली जुईनगर येथून जात असताना पोवार यांच्या घरावर दगडफेक झाली. यावेळी त्यांच्या घराजवळ थांबलेले पोवार समर्थक जखमी झाले. यानंतर जखमींना प्रमोद पोवार यांचे भाऊ सचिन पोवार यांनी सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी आणले.
या दगडफेकीत अमर नामदेव गायकवाड (वय २९), शोभा अनिल कुराडे (३८), संतोष धोंडिराम पोवार (३८), उषा विनायक कापूसकर (४७), प्रवीण राजन शिंदे (६६, सर्व रा. जुईनगर) हे पाचजण जखमी झाले. त्यांच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू होते. उपचारांनंतर सर्व जखमी फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले.