निपाणीतील ‘तो’ खून केवळ चैनीसाठी मित्रासह तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:55 AM2019-04-03T00:55:12+5:302019-04-03T00:55:46+5:30
अरविंद पोळ यांच्या खुनाच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले आहे. सुरुवातीला प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी
निपाणी : अरविंद पोळ यांच्या खुनाच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले आहे. सुरुवातीला प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती; पण मंगळवारी जिल्हा पोलीसप्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता हा खून केवळ चैनीसाठी झाल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी निपाणी पोलिसांनी सतीश शहाजी क्षीरसागर, रवी इराना शिरगावे व सौरभ अजित अथणी (२१, शिवाजीनगर, निपाणी) या अरविंदच्या मित्रांना अटक केली आहे.
दरम्यान, खणीत टाकलेला अरविंदचा मृतदेह सोमवारी दिवसभर न सापडल्याने संध्याकाळी शोधमोहीम थांबविण्यात आली होती; पण मंगळवारी दिनकर कांबळे यांनी अथक प्रयत्न करून ४0 फूट खोल जाऊन मृतदेह बाहेर काढला.
या प्रकरणाची माहिती अशी की, रविवारी दुपारी संशयित सतीश याने आपला मित्र अरविंद गौरीशंकर पोळ याला पार्टी करूया असे सांगून पांगीर येथील आपल्या आजीच्या घरात बोलावून घेतले. तेथे संशयित सौरभ व रवी यांच्या मदतीने त्याचा खून केला होता. यानंतर या तिघांनी अरविंदचा मृतदेह नांगनूर गावच्या हद्दीतील खणीत टाकला होता. प्रकरण उघडकीस आल्यावर या संशयितांनी पोलिसांना हा खून प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या रागातून सुपारी देऊन झाल्याचे सांगितले होते; पण सोमवारी रात्री त्यांनी नवीनच माहिती दिली. सतीश व अरविंद हे मित्र होते. अरविंद हा नेहमी दागिने घालून फिरत असे. त्याच्या दागिन्यातून चांगले पैसे मिळतील या विचाराने सतीशने मित्र रवी व सौरभच्या मदतीने हातोडीने वार करून खून केला. दागिने बंगलोर येथे विकायचे व त्या पैशातून चैनी करायची असे त्यांनी ठरवले होते, असे तपासात पुढे आले आहे.
मृताच्या डोक्यात पाच वार
दरम्यान, तासाभराच्या प्रयत्नांनंतर मृतदेह खणीतून बाहेर काढून पोलिसांनी पंचनामा केला. यावेळी मृताच्या डोक्यावर हातोडीने मारलेले पाच घाव आढळून आले आहेत. यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला.