डोक्यात दगड घालून वन कर्मचाऱ्याची हत्या, अनैतिक संबंधाचा संशय; हल्लेखोर स्वत: पोलीसात हजर
By उद्धव गोडसे | Updated: September 14, 2023 02:31 IST2023-09-14T02:24:58+5:302023-09-14T02:31:54+5:30
खून करणारा संशयीत युवराज कांबळे स्वत: जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजर झाला.

मृत भास्कर कांबळे आणि आरोपी युवराज कांबळे...
कोल्हापूर : अनैतिक संबंधाचा संशय घेत असल्याच्या रागातून भाजीपाला विक्रेता युवराज बळवंत कांबळे (वय २७ रा. कुडूत्री, ता. राधानगरी) याने वान कर्मचारी भास्कर शंकर कांबळे (वय ५०, रा. आणाजे, ता. राधानगरी) याच्या डोक्यात दगड घालून निघृर्ण खून केला. वारे वसाहत परिसरात बुधवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. खून करणारा संशयीत युवराज कांबळे स्वत: जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजर झाला.
भास्कर कांबळे व भाजीपाला विक्री करणारा युवराज कांबळे यांचे मैत्रीचे संबंध होते. ते दोघेही कुटुंबासह वारे वसाहत परिसरात राहत होते. त्यामुळे त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. मात्र, युवराजचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय भास्कर कांबळे याला होता. त्यातून त्यांच्यात वाद होता.
हा वाद मिटवण्यासाठी बुधवारी सायंकाळी दोघे संभाजी नगर येथील एका मित्राच्या घरात एकत्र आले होते. वाद मिटवून परत जाताना वारे वसाहत येथील महादेव मंदिराजवळ त्यांच्यात पुन्हा वाद झाला. झटापटीत खाली पडलेल्या भास्कर कांबळे याच्या डोक्यात दगड घालून युवराजने त्यांना ठार मारले. त्यानंतर तो स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.