दख्खनचा राजा जोतिबाची नागवेलीच्या पानातील महापूजा : नवरात्रोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 08:32 PM2018-10-10T20:32:10+5:302018-10-11T00:27:15+5:30
दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या नवरात्रोत्सवास मोठ्या धार्मिक उत्साहात प्रारंभ झाला. पाहिल्या माळेला जोतिबा देवाची नागवल्ली पानातील महापूजा बांधून धुपारती सोहळ्याने घट बसविण्यात आले.
जोतिबा : दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या नवरात्रोत्सवास मोठ्या धार्मिक उत्साहात प्रारंभ झाला. पाहिल्या माळेला जोतिबा देवाची नागवेलीच्या पानातील महापूजा बांधून धुपारती सोहळ्याने घट बसविण्यात आले.
जोतिबा मंदिरात पहाटे तीन वाजता महाघंटेचा नाद करून दरवाजे उघडण्यात आले. पहाटे ४ ते ५ या वेळेत जोतिबा मूर्तीची पाद्यपूजा, मुख मार्जन, काकड आरती झाली. पहाटे ५ ते ६ यावेळेत पंचामृत महाभिषेक विधी झाला. ६ वाजता घटस्थापनेनिमित्त नागावल्ली पानातील अलंकारी बैठी महापूजा बांधण्यात आली. खडकलाट (ता. चिकोडी) गावातील भाविकाने नागवेलीची पाने पुरविली. सकाळी ९ वाजता घटस्थापनेसाठी श्रींचे पुजारी उंट, घोडे, देव सेवक वाजंत्रीच्या लवाजम्यासह धुपारती सोहळ्यास निघाले.
देवस्थान समितीचे प्रभारी महादेव दिंडे, सिंधिया ग्वाल्हेर ट्रस्टचे आर. टी. कदम, सरपंच डॉ. रिया सांगळे, अजित भिवदर्णे, समस्त गांवकर, नवरात्र उपासक, भाविक सहभागी झाले होते. यमाई, तुकाई, भावकाई मंदिरात घट बसविण्यात आले. कर्पुरेश्वर तीर्थकुंडात दिवा सोडण्याचा विधी झाला. धुपारती मार्गावर दुतर्फा सडा रांगोळी घालण्यात आली होती. सुवासिनींनी पायावर पाणी घालून धुपारतीचे औक्षण केले. सुगंधी दुधाचे वाटप केले. दुपारी १ वाजता धुपारती जोतिबा मंदिरात आल्यावर तोफेची सलामी देऊन अंगारा वाटप केला. सांयकाळी राम मिस्त्री प्रस्तुत विश्वकर्मा गीतमंच, कोल्हापूर यांचा भक्ति व भावगीतांचा कार्यक्रम झाला.