उपवडे तलावाच्या मुख्य भरावावर झुडपांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:28 AM2021-09-05T04:28:38+5:302021-09-05T04:28:38+5:30

सांगरूळ : उपवडे (ता. करवीर) येथील तलावाच्या मुख्य भरावाच्या दगडी पिचिंगवर झाडाझुडपांचे प्रमाण वाढले आहे. ...

The kingdom of shrubs on the main embankment of Upavade Lake | उपवडे तलावाच्या मुख्य भरावावर झुडपांचे साम्राज्य

उपवडे तलावाच्या मुख्य भरावावर झुडपांचे साम्राज्य

Next

सांगरूळ : उपवडे (ता. करवीर) येथील तलावाच्या मुख्य भरावाच्या दगडी पिचिंगवर झाडाझुडपांचे प्रमाण वाढले आहे. पाटबंधारे विभागाचे याकडे सोईस्कर दुर्लक्ष आहे. सध्या हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून या झाडांच्या मुळांमुळे पिचिंग निखळले जाऊन तलावाच्या भरावाला धोका निर्माण होऊ शकतो. दोन दिवसांपूर्वी मेघोली तलावही किरकोळ गळतीच्या कारणामुळे फुटला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची दखल घेत पाठबंधारे विभागाने तातडीने झाडेझुडपे काढावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे.

सांगरूळच्या पूर्वेला असणाऱ्या बारा वाड्यावस्त्या ओलिताखाली आणून पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी तत्कालीन कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोन्द्रे यांनी उपवडे तलावासाठी मंजुरी मिळवली. २.७३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा तलावात असतो. दरम्यान सध्या तलावाच्या मुख्य भरावावर असणाऱ्या पिचिंगवर मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे उगवली आहेत. या झाडांच्या मुळांमुळे पिचिंगला असणारे दगड निखळण्याची शक्यता असल्याने तलावाच्या मुख्य भरावाला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. सध्या तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. प्रशासनाने तातडीने ही झाडे काढली पाहिजेत. त्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

सध्या हा तलाव अर्धा गाळाने व्यापला असून गेल्या अनेक वर्षांपासून तलावातील गाळ काढण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. दर पावसाळ्यात तलाव काठोकाठ भरून सांडव्यातून पाणी वाहून जाते. तलाव पूर्ण क्षमतेने भरूनही गाळाचे प्रमाण जास्त असल्याने पाण्याचा साठा कमी होतो. त्यातच धरणाच्या भरावाच्या पिचिंगवर झाडेझुडपे वाढल्याने तलावाची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाने तलावांच्या डागडुजीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात आहे.

प्रतिक्रिया राजेंद्र सूर्यवंशी (करवीर पं. स. सदस्य)

गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही तलावातील गाळ काढावा अशी मागणी करत आहोत; पण पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. सध्या तर तलावाच्या भरावावर झाडाझुडपांचे साम्राज्य पसरले आहे. तातडीने लक्ष न घातल्यास तलावाला धोका निर्माण होऊ शकतो. पाटबंधारे विभागाने तातडीने उपाययोजना करावी; अन्यथा परिसरातील शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला.

Web Title: The kingdom of shrubs on the main embankment of Upavade Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.