राजे गटास गोकुळची उमेदवारी मिळालीच पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:22 AM2021-04-18T04:22:37+5:302021-04-18T04:22:37+5:30
कागल : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये सत्तारूढ आघाडीकडून राजे गटास उमेदवारी मिळालीच पाहिजे, अन्यथा या निवडणुकीपुरता आम्हाला आमचा ...
कागल
: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये सत्तारूढ आघाडीकडून राजे गटास उमेदवारी मिळालीच पाहिजे, अन्यथा या निवडणुकीपुरता आम्हाला आमचा मार्ग मोकळा करा, अशा तीव्र भावना गटाच्या ठरावधारक कार्यकर्त्यांनी समरजित घाटगे यांच्यासमोर व्यक्त केल्या. यावेळी कागल, करवीर तालुक्यासह जिल्ह्यातील १५० हून अधिक ठरावधारक उपस्थित होते.
सहा एप्रिल रोजी या गटाचा असा मेळावा झाला होता. त्यामध्ये राजे गटाला बेदखल केल्याचा राग कार्यकर्त्यांनी व्यक्त केला होता.
सत्तारूढ गटाचे नेते महादेवराव महाडिक यांनी दोन दिवसांपूर्वी घाटगेंची भेट घेऊन निवडणुकीच्या व्यूव्हरचनेबद्दल चर्चा केली होती. या पार्श्वभूमीवर समरजित घाटगे यांनी ठरावधारकांचा मेळावा घेतला. त्यामध्ये अनेक ठरावधारकांनी आक्रमक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. कोणत्याही परिस्थितीत राजे गटास उमेदवारी घेण्याबाबत कार्यकर्ते ठाम राहिले. आक्रमक कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न घाटगे यांनी केला. यावेळी राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, सुनीलराज सूर्यवंशी, भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील आदींची भाषणे झाली. आभार युवराज पाटील यांनी मानले.
चौकट
उमेदवारीबद्दल ठोस शब्द नाही...
शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे म्हणाले, महादेवराव महाडिक यांनी आपले नेते समरजित घाटगे यांची भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा करून निर्णय कळवत असल्याचे सांगितले आहे. अद्याप कोणताही ठोस शब्द मिळालेला नाही. आपल्या गटाला अजूनही जर कुणी गृहीत धरत असेल तर कार्यकर्ते ऐकणार नाहीत.
उमेदवारी माघार घेणार नाही
प्रा. सुनील मगदूम म्हणाले की, समरजित घाटगे आमचे नेते आहेत. त्यांचा आदेश आमच्यासाठी सर्वोच्च आहे. मात्र, या निवडणुकीपुरते आम्हाला माफ करा. जर आपल्या गटास उमेदवारी मिळाली नाही तर आपण सांगितले तरीही माझी उमेदवारी मागे घेणार नाही. नागाव येथील संजय नाईक यांनीही अशीच भावना मांडली.
फोटो कॅपशन
कागल येथे राजे गटाच्या ठरावधारकांच्या मेळाव्यास समरजित घाटगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाबासाहेब पाटील, एम. पी. पाटील, अमरसिंह घोरपडे आदी उपस्थित होते.