किणी ग्रामीण रुग्णालय ठरणार अपघातग्रस्तांना वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:25 AM2021-04-09T04:25:05+5:302021-04-09T04:25:05+5:30
आयुब मुल्ला लोकमत न्यूज नेटवर्क खोची : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला किणी येथील ग्रामीण रुग्णालय उभारणीचा प्रश्न अखेर ...
आयुब मुल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क खोची : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला किणी येथील ग्रामीण रुग्णालय उभारणीचा प्रश्न अखेर निकालात निघाला आहे. महामार्गावरील होणाऱ्या अपघातातील अपघातग्रस्तांना तातडीच्या उपचारांसाठी महामार्गावर आधुनिक रुग्णालय असावे यासाठी ‘लोकमत’ने याबाबत मालिका लिहून आवाज उठविला होता. किणी येथील रुग्णालयात आधुनिक सोसीसुविधांची सोय केल्यास अपघातग्रस्तांसाठी हे वरदान ठरणार आहे. परिसरातील जनतेतून रुग्णालयाच्या मान्यतेचे स्वागत होत आहे.
किणी येथील ग्रामीण रुग्णालयाचे काम आठ वर्षांपासून मंत्रालयीन पातळीवर अटकले होते. अनेक त्रुटीचा सामना करीत जागेचा प्रश्न सुटल्यानंतरही निधीअभावी बांधकाम परवानगीच्या कचाट्यात सापडले होते. तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटल व्हावे यासाठी सुरुवातीच्या काळात जोमाने प्रयत्न केले. गावचे सुपुत्र व मंत्रालयीन अधिकारी सुहास चव्हाण यांनी मंत्रालयीन पातळीवर केलेले प्रारंभीच्या टप्प्यातील प्रयत्न फार महत्त्वाचे होते.
मध्यंतरी विविध अडचणींमुळे कामाला विलंब होत गेला. महामार्गावरील वाढते अपघात आणि परिसरात सरकारी रुग्णालयाची गरज पाहता याबाबत ‘लोकमत’मधून रुग्णालय त्वरित व्हावे यासाठी पाठपुरावा करण्यात आला. लोकप्रतिनिधींनी याची दखल घेत हा विषय नेटाने पुढे नेला. आमदार राजू आवळे यांनी गेल्या आठ-दहा महिन्यांत आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील(यड्रावकर) यांच्याकडे निवेदन देऊन सतत पाठपुरावा केला. राजेंद्र पाटील यांनी रुग्णालयासाठी मदत करण्याचे ठोस आश्वासन आवळे यांना दिले होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याची शिफारस करून मदत करण्याचे आश्वासन दिले.
ग्रामस्थ, प्रवासी वर्गातून मात्र रुग्णालय तातडीने झाले पाहिजे याचा रेटा सुरूच होता. जवळच्या मतदारसंघातील व नेहमी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून किणी मार्गे मुंबईला जाणारे आरोग्य राज्यमंत्री यांना याविषयीची तीव्रता गरज माहीत असल्याने या विषयात त्यांनी अगदी मनापासून लक्ष घातले. त्यांच्याकडे आरोग्य खात्याची जबाबदारी असल्याने विशेष प्रयत्न करीत बांधकामास प्रशासकीय मंजुरी देण्याकरिता चांगली मदत केली. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतरच निधीची तरतूद करण्याचा विषय मार्गी लागला.
अपघातप्रवण क्षेत्रात आधुनिक सुविधांची गरज
शिरोलीपासून किणी व तेथून पुढे कऱ्हाडपर्यंत मोठे शासकीय रुग्णालय नसल्याने महामार्गावर होणाऱ्या अपघातातील अपघातग्रस्तांची मोठी गैरसोय होते. अपघात प्रवण क्षेत्र असल्याने परिसरात रुग्णालयाची गरज सतत पुढे येत होती.
३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयासाठी १४ कोटी २१ लाखांच्या इमारत बांधकामाची प्रशासकीय मंजुरी मिळाली. हे रुग्णालय उभे राहिल्यानंतर त्यात आधुनिक सुविधा निर्माण केल्यास अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार आहे. लवकरात लवकर निविदा प्रक्रिया होऊन कामास सुरुवात होण्यासाठी पाठपुरावा गरजेचा आहे.