HSC Result2024: कोरोनात वडील गेले, सलून दुकान चालवून दिसला आशेचा 'किरण'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 12:04 PM2024-05-22T12:04:17+5:302024-05-22T12:05:00+5:30
राम मगदूम गडहिंग्लज : ‘कोरोना’मध्ये वडिलांचे निधन झाल्यामुळे शैक्षणिक खर्चासाठी सलूनचा व्यवसाय पुढे चालवत जिद्दी पोराने कला शाखेत तब्बल ...
राम मगदूम
गडहिंग्लज : ‘कोरोना’मध्ये वडिलांचे निधन झाल्यामुळे शैक्षणिक खर्चासाठी सलूनचा व्यवसाय पुढे चालवत जिद्दी पोराने कला शाखेत तब्बल ७९.३३ टक्के गुण मिळविले. किरण कृष्णा यादव (रा. मासेवाडी, ता. आजरा) असे त्याचे नाव आहे. त्याला ॲनिमेशन क्षेत्रात करिअर करायचे आहे.
उत्तूर विद्यालयातून ७८ टक्के गुणांनी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने येथील जागृती प्रशालेत प्रवेश घेतला. त्याचे वडील कृष्णा हे अत्याळमध्ये सलूनचे दुकान चालवत तर आई शोभा या शेतमजुरी करीत होत्या. कृष्णा यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर संकटाचे डोंगर कोसळले; परंतु ते डगमगले नाहीत.
आई शोभा यांनी डोंगरेवाडी येथील एका हॉटेलात काम पत्करले, तर ‘किरण’ने मासेवाडीतील राहत्या घरातच सलूनचा व्यवसाय सुरू केला. चित्रकला व पेन्टिंगचा छंद जोपासता यावे म्हणूनच त्याने कला शाखा निवडली. भाऊ तेजस यानेही संगणक शाखेची पदवी घेतली आहे. प्राचार्य विजयकुमार चौगुले, उपप्राचार्या अनिता चौगुले, वर्गशिक्षक योगेश पाटील यांचे प्रोत्साहन व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश मिळाले, असे त्यांनी सांगितले.