‘लाल परी’च्या सेवेत मानाचा तुरा खोवणाऱ्या ‘किरण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:23 AM2021-03-08T04:23:45+5:302021-03-08T04:23:45+5:30

कोल्हापूर : ‘कोल्हापूर, कोल्हापूर, कोल्हापूर...!’ असे प्रवाशांना पुकारा करणारे शब्द पुणे, सातारा, बेळगाव, आदी ठिकाणांसह एस.टी. महामंडळाच्या बसस्थानकांत ...

'Kiran', who lost her dignity in the service of 'Lal Pari' | ‘लाल परी’च्या सेवेत मानाचा तुरा खोवणाऱ्या ‘किरण’

‘लाल परी’च्या सेवेत मानाचा तुरा खोवणाऱ्या ‘किरण’

googlenewsNext

कोल्हापूर : ‘कोल्हापूर, कोल्हापूर, कोल्हापूर...!’ असे प्रवाशांना पुकारा करणारे शब्द पुणे, सातारा, बेळगाव, आदी ठिकाणांसह एस.टी. महामंडळाच्या बसस्थानकांत ऐकण्यास मिळतात. यात बऱ्याचदा पुरुष वाहकच असा पुकारा देताना आपणास दिसतही असतील. मात्र, आता हीच साद एक महिला वाहकही प्रवाशांना तितक्याच जोमाने घालू लागली आहे. इतकेच काय, प्रसंगी स्वत: प्रवाशांचे ओझे उचलून बसमध्ये ठेवणे, महिलांसह वृद्ध प्रवाशांना प्रवासादरम्यान अडचण आल्यास मदत करणे, अशा जबाबदाऱ्या लीलया पेलणाऱ्या व एस.टी. महामंडळाच्या सेवेत आपल्या सौजन्याने मानाचा तुरा खोवणाऱ्या कोल्हापूर मध्यवर्ती आगारातील महिला वाहक किरण लोकरे यांच्याविषयी थोडेसे...

किरण या मूळच्या सुभाषनगरात राहणाऱ्या. इतर मुलींप्रमाणे शालेय शिक्षणानंतर न्यू काॅलेजमधून त्या बारावी उत्तीर्ण झाल्या. २०१२ साली एस.टी. महामंडळामध्ये वाहक पदाची भरती आली. त्यात उत्तीर्ण होऊन त्या रत्नागिरी विभागातील चिपळूण आगारामध्ये रुजू झाल्या. सहा वर्षांच्या खडतर सेवेनंतर त्यांची २०१८ साली कोल्हापूर विभागात बदली झाली. आईवडिलांकडून सहनशीलतेसह सुसंस्कार मिळाल्यामुळे ‘अतिथी देवो भव’ त्यांचा नेहमीचा स्वभाव बनला आहे. प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वर्तणुकीबरोबरच वयोवृद्ध प्रवाशांचे ओझे स्वत:हून उचलून बसमध्ये ठेवणे वा उतरतेवेळी त्यांना देणे, बस भरल्यानंतर स्वत: प्रसंगी इंजिनच्या बाॅनेटवर बसून प्रवाशांना आपले आसन बसावयास देणे, एस.टी.चा प्रवास किती सुखकर, भरवशाचा आहे, याबाबतचे प्रबोधनही त्या नियमितपणे करतात. प्रवासादरम्यान बसमध्ये बिघाड झाल्यानंतर वेळप्रसंगी चालकाच्या मदतीलाही त्या धावतात. मध्यवर्ती बसस्थानकात गेल्यानंतर कऱ्हाड, सातारा, बेळगाव अशा गावांच्या नावाने पुरुष वाहकांप्रमाणे मोठ्याने साद घालणाऱ्या एकमेव महिला वाहक किरण लोकरे याच आहेत, अशी त्यांची ओळख बनली आहे.

फोटो : ०७०३२०२१-कोल-किरण लोकरे (महिला दिन)

Web Title: 'Kiran', who lost her dignity in the service of 'Lal Pari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.