किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव

By Admin | Published: September 30, 2015 01:12 AM2015-09-30T01:12:45+5:302015-09-30T01:15:55+5:30

आठ आॅक्टोबरपासून प्रारंभ : ग्रीन गार्डसला ‘वसुंधरा मित्र’

Kirloskar Vasundhara Film Festival | किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव

किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव

googlenewsNext

कोल्हापूर : सहावा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शुक्रवार (दि. ८आॅक्टोबर) पासून सुरू होत आहे. त्याअंतर्गत पराग केमकर, राजा उपळेकर, ग्रीन गार्डस् या संस्थेला वसुंधरा मित्र व आदर्श सहेली मंच, युवक मित्रमंडळ राजारामपुरी व कोल्हापूर अग्निशामक दल यांचा ‘वसुंधरा गौरव’ने सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी व ‘किर्लोस्कर’चे सरव्यवस्थापक विश्वास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, महोत्सवाचे उद्घाटन शाहू स्मारक भवनमध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त सदस्य सचिव डॉ. दिलीप बोरालकर यांच्या हस्ते व ‘किर्लोस्कर’चे सह. संचालक आर. आर. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली होईल.
यंदा ‘शून्य कचरा’ हे महोत्सवाचे घोषवाक्य आहे. दि. ९ आॅक्टोबरला ‘वसुंधरा मित्र’ व ‘वसुंधरा गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, तर दि. ११ आॅक्टोबरच्या सांगता समारंभात ‘वसुंधरा सन्मान’ हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
पराग केमकर हे पोलीस दलातील वायरलेस व रेडिओ कम्युनिकेशनमध्ये कार्यरत होते. गेल्या सात वर्षांपासून ते कचरा व टाकाऊ अन्नापासून बायोगॅस तयार करून त्यांचा वापर करतात व प्रशिक्षणही देतात. सौरचुल, सौरकंदिल, शेतातील धान्य वाळवणी यंत्र यांची प्रात्यक्षिके देतात.
राजा उपळेकर हे छायाचित्रकार असून त्यांनी रंकाळा परिसरात कासव बचाव, सर्प बचाव अशा मोहिमेत सहभाग घेतला आहे. चित्रकारितेतही त्यांचा हातखंडा आहे. आदर्श सहेली मंचतर्फे टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवून त्यांचे प्रदर्शन व विक्री केली जाते. युवक मित्र मंडळाने ‘लाभांकूर’ हा प्रकल्प राबवून ‘शून्य कचरा’ ही संकल्पना रूजवली आहे. माणसासह मुक्या प्राण्यांच्याही मदतीला धावणाऱ्या ‘अग्निशमन दला’ने गेल्या तीन वर्षांत ७५० हून अधिक प्राणी, पक्षांना जीवदान दिले आहे.
चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुमारे ४० लघुपट दाखविण्यात येणार आहेत. महोत्सव नि:शुल्क असून त्यासाठी १ तारखेपासून दुपारी ३ ते रात्री ८ यावेळेत कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी, गाळा नं ७, पहिला मजला, शाहू स्टेडियम, राणे-जोशी आॅर्थोपेडिकसमोर येथे नावनोंदणी करण्यात येईल, तरी इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Kirloskar Vasundhara Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.