किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवाचा आज समारोप
By admin | Published: September 21, 2014 12:52 AM2014-09-21T00:52:05+5:302014-09-21T00:52:05+5:30
कोल्हापूर : ‘प्रयत्न छोटा बदल मोठा’ या ब्रीदवाक्याने सुरू झालेल्या
कोल्हापूर : ‘प्रयत्न छोटा बदल मोठा’ या ब्रीदवाक्याने सुरू झालेल्या आणि गेली तीन दिवस पर्यावरणाचा जागर केलेल्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्या, रविवारी समारोप होत आहे.
शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण सकाळी ११ वाजता होणार आहे. मराठी रंगभूमीचा इतिहास मांडणाऱ्या ‘नांदी’ या नाटकातील कलाकार शरद पोंक्षे, अविनाश नारकर, अश्विनी एकबोटे यांच्या हस्ते हे पारितोषिक दिले जातील.
महोत्सव समारोपाचा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ता शिंदे यांच्या हस्ते डॉ. जय सामंत यांना वसुंधरा सन्मान हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. यानंतर टील्डा स्वींटन दिग्दर्शित ‘बॉर्न आॅफ फायर’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन चंद्रकांत जोशी, दिलीप बापट यांनी केले आहे.
महोत्सवात शनिवारी हातकणंगले तालुक्यातील कोंडिग्रे येथील निर्यातदार शेतकरी गणपतराव पाटील यांच्या हरितगृहाला निसर्गप्रेमींनी भेट दिली. दुपारी शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात ‘ई-कचरा व्यवस्थापन’ या विषयावर मनोज मेहता यांनी मार्गदर्शन केले. संगणक व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे निर्माण झालेल्या समस्या मांडताना त्यांनी ई-कचऱ्याचा पुनर्वापर, या कचऱ्यापासून बनविण्यात येणाऱ्या वस्तुंचीही माहिती दिली.
यानंतर राणिता चौगुले यांनी फुले, पाने, फळे यांच्यापासून रंग तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. बाजारात मिळणारे खाण्याचे रंग, रंगपंचमीला वापरले जाणारे रंग यामध्ये रासायनिक द्रव्ये असल्याने शरीरावर घातक परिणाम होतात. मात्र हे नैसर्गिक रंग दर्जेदार, टिकाऊ आणि आरोग्यपूर्ण असतात. त्यामुळे त्यांचा वापर खाद्यपदार्थांपासून ते कपडे, चित्र रंगवणे, रंगीबेरंगी रांगोळी तयार करण्यापर्यंत करता येतो. (प्रतिनिधी)