kirnotsav : अंबाबाईच्या किरिटापर्यंत पोहोचली किरणे, मुख्य दिवस 'आज'पासून सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 11:15 AM2022-01-31T11:15:12+5:302022-01-31T12:18:28+5:30
श्री अंबाबाई मंदिरात उत्तरायण कालखंडातील किरणोत्सव सोहळा सुरू
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात उत्तरायण कालखंडातील किरणोत्सव सोहळा सुरू झाला आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी पूर्ण किरणोत्सव झाला. मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या चेहऱ्यापर्यंत पूर्ण क्षमतेने पोहोचून किरिटापर्यंत त्यांचा प्रवास झाला.
या किरणोत्सव सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजून ३२ मिनिटांनी मावळतीची सूर्यकिरणे महाद्वार कमानीतून आत आली. त्यानंतर गरुड मंडप, गणपती, कासव चौक, अशी टप्पे पूर्ण करत ६ वाजून १५ मिनिटांनी किरणांनी देवीचा चरणस्पर्श केला. तेथून पुढे ६ वाजून १७ ते १८ मिनिटांपर्यंत ती चेहऱ्यावरून किरिटापर्यंत पोहोचून लुप्त झाली. पूर्ण किरणोत्सव झाल्याने भाविकांतून समाधान व्यक्त झाले.
दरम्यान, स्वच्छ वातावरण आणि किरणोत्सव मार्गातील अडथळे दूर केल्याने रविवारी पूर्ण किरणोत्सव झाला. किरणोत्सव सोहळ्यातील मुख्य दिवस आज, सोमवारपासून सुरू होणार आहे. या किरणोत्सव सोहळ्यानिमित्त घाटी दरवाजावरील घंटा तात्पुरत्या स्वरूपात सुरू केली आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.
किरणांची तीव्रता चारपटींनी अधिक
- हवेत धूलिकण नव्हते. स्वच्छ वातावरण होते. त्यासह शनिवारपेक्षा मावळतीच्या सूर्यकिरणांची तीव्रता रविवारी चारपटींनी अधिक होती. आर्द्रतादेखील अपेक्षेप्रमाणे होती. या सर्व स्थितीमुळे दुसऱ्या दिवशी पूर्ण किरणोत्सव झाला.
- सूर्यकिरणे देवीच्या किरिटापर्यंत पोहोचली. नोव्हेंबरमधील किरणोत्सवात ढगाळ वातावरणाचा अडथळा निर्माण झाला होता. उत्तरायण कालखंडात सलग दोन दिवस वातावरण स्वच्छ राहिल्याने किरणोत्सव चांगला झाला.
- त्यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त होत असल्याचे विवेकानंद कॉलेजमधील पदार्थविज्ञान व खगोलशास्त्र विभागप्रमुख प्रा. मिलिंद कारंजकर यांनी सांगितले.
किरणांचा प्रवास असा
महाद्वार कमान : ५ वाजून ३२ मिनिटे
गरुड मंडप : ५ वाजून ३६ मिनिटे
गरुड मंडप मध्य : ५ वाजून ४२ मिनिटे
गणपती मंदिर मागील बाजू : ५ वाजून ५३ मिनिटे
कासव चौक : ६ वाजून १ मिनिट
पितळी उंबरठा : ६ वाजून ४ मिनिटे
चांदीचा उंबरठा : ६ वाजून ८ मिनिटे
गर्भगृह पहिली पायरी : ६ वाजून १४ मिनिटे
चरण स्पर्श : ६ वाजून १५ मिनिटे
चेहरा ते किरीट : ६ वाजून १७ ते १८ मिनिटे