कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात आजपासून किरणोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 01:36 PM2024-01-29T13:36:27+5:302024-01-29T13:37:20+5:30
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आज, सोमवार दि.२९ जानेवारीपासून उत्तरायण कालखंडातील सलग पाच दिवस किरणोत्सव सोहळा भाविकांना ...
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आज, सोमवार दि.२९ जानेवारीपासून उत्तरायण कालखंडातील सलग पाच दिवस किरणोत्सव सोहळा भाविकांना अनुभवायला मिळणार आहे. शनिवारी आणि रविवारी मंदिरात किरणोत्सव मार्गाची पाहणी आणि मावळतीच्या सूर्यकिरणांच्या तीव्रता यांची तपासणी करण्यात आली. रविवारी घेतलेल्या चाचणीनुसार ढगाळ हवामानामुळे किरणोत्सव झाला नाही.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि किरणोत्सव अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर यांनी दिलेल्या माहितीनुसार किरणोत्सवाचा हा सोहळा पाच दिवसांचा असेल. शनिवारी सूर्यकिरणांनी अंबाबाईच्या गाभाऱ्यातील पितळी उंबरठ्यापर्यंत स्पर्श केला होता. मात्र, रविवारी ढगाळ वातावरणामुळे किरणांनी मंदिरात प्रवेश केला नाही.
दरम्यान, आज सोमवारी ढगाळ वातावरण, प्रदूषण आणि आर्द्रता यांचा अडथळा नसेल तर सूर्यकिरणे देवीला करप्रवेश करून गाभाऱ्यात कमरेपर्यंत येण्याची शक्यता आहे. डॉ. कारंजकर अभ्यासासाठी सायंकाळी सूर्यकिरणांच्या तीव्रतेची तपासणी करणार आहे. किरणोत्सव मार्गात काही अडथळे आहेत का, याबाबतची पाहणीही केली जाणार आहे. मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर-देसाई, किरणोत्सव अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर यावेळी उपस्थित होते.