किसान पुत्र संघर्ष यात्रेचा मंगळवारी कोल्हापुरातून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:11 AM2021-02-05T07:11:08+5:302021-02-05T07:11:08+5:30
कोल्हापूर : कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ऑल इंडिया यूथ फेडरेशन (एआयवायएफ) आणि ऑल इंडिया ...
कोल्हापूर : कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ऑल इंडिया यूथ फेडरेशन (एआयवायएफ) आणि ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ) देशव्यापी आंदोलन करीत आहे. याअंतर्गत राज्यातील विविध विभागातून ‘किसान पुत्र संघर्ष’ यात्रा आयोजित केली आहे. त्याचा प्रारंभ मंगळवारी (दि. २) कोल्हापुरातून होणार आहे. यात्रेत युवक, विद्यार्थी आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले, मुली सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘एआयवायएफ’चे जिल्हाध्यक्ष हरिश कांबळे आणि ‘एआयएसएफ’चे जिल्हा सचिव जावेद तांबोळी यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या विभागातून एकाचवेळी मंगळवार ते शुक्रवारदरम्यान ही यात्रा निघणार आहे. यात्रेच्या माध्यमातून निघणारे सर्व जथे दि. ८ फेब्रुवारीस मुंबईत एकत्र येतील. तेथून गुजरात, राजस्थान, सिंधु बॉर्डर मार्गे दिल्लीतील आंदोलनात सहभागी होतील, असे हरिश कांबळे यांनी सांगितले.
कोल्हापूर विभागातील यात्रेचा प्रारंभ मंगळवारी सकाळी नऊ वाजता न्यू कॉलेजमध्ये ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील आणि जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या उपस्थितीत होईल. तेथून शाहू समाधीस्थळ येथे अभिवादन करून यात्रा मार्गक्रमण करेल. शिंगणापूर, शिरोली, अंबपसह महामार्गालगतच्या गावांमध्ये जनजागृती करत यात्रा निघणार असून शुक्रवारी ती पुणे येथील फुलेवाड्यात पोहोचणार असल्याचे जावेद तांबोळी यांनी सांंगितले.
या पत्रकार परिषदेस आरती रेडेकर, गिरीश फोंडे, प्रशांत आंबी, हर्षवर्धन कांबळे, केदार तहसीलदार, सुनील कोळी, योगेश कसबे उपस्थित होते.
चौकट
माहितीपट, गीतांद्वारे जनजागृती
यात्रेत माहितीपट, चळवळीची गीते याद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाईल. कोल्हापुरात ५० युवक-युवती आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची दहा मुले-मुली सहभागी होणार असल्याचे गिरीश फोंडे यांनी सांगितले.