सत्ताधाऱ्यांचा पतंग, तर विरोधकांना कपबशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:26 AM2021-04-23T04:26:21+5:302021-04-23T04:26:21+5:30
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मागणी केल्याप्रमाणे सत्ताधारी आघाडीला पतंग, तर विरोधी आघाडीला कपबशी या चिन्हांवर ...
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मागणी केल्याप्रमाणे सत्ताधारी आघाडीला पतंग, तर विरोधी आघाडीला कपबशी या चिन्हांवर गुरुवारी निवडणूक विभागाने अधिकृत शिक्कामोर्तब केले. अपक्ष वैशाली पाटील यांना अंगठी, तर दिनकर कांबळे व शामराव बेनके यांना रोडरोलर हे चिन्ह मिळाले.
गोकुळ निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी गुरुवारी गोकुळच्या रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी घोषित करून निवडणूक चिन्हांचेही वाटप केले. मंगळवारी माघारीदिवशीच चिन्ह मागणीचे अर्ज घेण्यात आले. यात सत्ताधारी आघाडीने पतंग, तर विरोधी आघाडीने कपबशी या चिन्हाची मागणी नोंदवली होती. त्यानुसार गुरुवारी ही चिन्हे देण्यात आली. आता चिन्ह मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचारास सुरुवात होणार आहे.
कपबशी हे चिन्ह जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुकीतील सर्वाधिक मागणी असणारे चिन्ह आहे. त्यामुळे निवडणूक कोणतीही असो, यावर दावा सांगण्यासाठी स्पर्धा लागलेली असते. गोकुळची निवडणूकही त्याला अपवाद राहिली नाही. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत याच चिन्हावर अपक्ष म्हणून सदाशिवराव मंडलिक यांनी खासदारकीची अटीतटीची निवडणूक जिंकत जिल्ह्याच्या राजकारणात वेगळा इतिहास रचला. याच चिन्हावर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातूनही राजू शेट्टी यांनी खासदारकीचा फड जिंकला. राधानगरी- भुदरगड विधानसभा मतदारसंघात के. पी. पाटील हे अपक्ष म्हणून पहिल्यांदा आमदार झाले तेव्हाही त्यांचे कपबशी हेच चिन्ह होते.