किटलीबॉयचा मुलगा झाला कॅबिनेट मंत्री

By admin | Published: November 1, 2014 12:38 AM2014-11-01T00:38:50+5:302014-11-01T00:42:18+5:30

पक्षनिष्ठा पावली : ३५ वर्षांच्या कार्याचे फळ, अभाविप कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्रिपदापर्यंतचा प्रवास

Kittenboy's son was a cabinet minister | किटलीबॉयचा मुलगा झाला कॅबिनेट मंत्री

किटलीबॉयचा मुलगा झाला कॅबिनेट मंत्री

Next

विश्वास पाटील - कोल्हापूर
मुंबईतील कापड गिरण्यांतील चाय किटलीवाल्याचा मुलगा ते राज्याच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री अशी कोणत्याही सर्वसामान्य माणसाला अभिमान वाटावी अशीच चंद्रकांतदादा पाटील यांची कारकीर्द. गुजरातचा चहावाला देशाचा पंतप्रधान झाला. आता मुंबईतील चहावाल्याचा मुलगा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री झाला आहे. ही सगळी किमया भाजप पक्षाची व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावाची आहे.
पाटील यांचे वडील मूळचे शेतकरी. भुदरगड तालुक्यातील गारगोटीजवळ त्यांचे खानापूर नावाचे सुमारे तीन हजार लोकवस्तीचे छोटेसे गाव; परंतु गावात पोट भरत नाही म्हणून आमदार पाटील यांचे वडील बच्चू पाटील हे मुंबईत गेले. मफतलाल नंबर २ या मिलमध्ये ते नोकरीस होते. मिलच्या कॅँटिनमध्ये किटलीबॉय अशी त्यांची नोकरी होती. त्यामुळे आमदार पाटील यांचा जन्म, बालपण व शिक्षणही मुंबईतच झाले. त्यावेळी हार्बर स्टेशन परिसरात ते राहत होते. दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात त्यांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण झाले. व्हीटीच्या सिद्धार्थ कॉलेजमधून ते कॉमर्स शाखेचे पदवीधर होऊन बाहेर पडले. कॉलेजला असतानाच त्यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संपर्क आला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी संघटनेसाठी पूर्ण वेळ वाहून घेण्याचा निर्णय घेतला. संघटनेचे तेरा वर्षे ते पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून फिरत होते. त्यांच्याकडे जळगाव, धुळे, नाशिक, विदर्भ व नंतरच्या टप्प्यात गुजरात व गोवा राज्यांत काम करण्याची जबाबदारी होती. त्याचवेळी त्यांची नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याशी ओळख झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते १९९० ते ९३ या काळात अखिल भारतीय सरचिटणीस होते. हे काम केल्यानंतर ते मूळ गावी खानापूरला परतले व दोन वर्षे शेती केली. पुढे १९९५ च्या सुमारास टेलिमॅटिक्स नावाच्या संगणक कंपनीचे संचालक झाल्यावर ते पुन्हा कोल्हापुरात स्थायिक झाले.
आमदार पाटील यांच्या राजकारणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पगडा आहे. त्यांची जडणघडणही त्याच मुशीतून झाली आहे. संघाचे ते १९९५ ते ९९ पर्यंत कोल्हापूर विभागाचे सहकार्यवाह होते. २००४ मध्ये ते भाजपचे राज्य चिटणीस झाले. त्यांच्याकडे २००६ला पक्षाच्या राज्य सरचिटणीसपदाची जबाबदारी आली. २००८ला पुणे पदवीधर मतदारसंघातून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश पाटील-वाठारकर यांचा नऊ हजार मतांनी पराभव करून आमदार झाले. त्यानंतर २००९ला ते भाजपचे राज्य उपाध्यक्ष झाले. २०१४ला झालेल्या पुणे पदवीधर मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा आमदार झाले. विधानपरिषदेत ते पक्षाचे प्रतोद होते. शिवाजी व सोलापूर विद्यापीठांच्या सिनेटवर ते आहेत. मितभाषी, कार्यकर्त्याला सन्मान देणारे व विकासाचा स्वत:चा असा एक दृष्टिकोन असलेले नेते अशी आमदार पाटील यांची ओळख आहे. दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्याशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. संघाचे जुनेजाणते दिवंगत कार्यकर्ते अण्णा ठाकूर यांचाही चंद्रकांतदादा यांच्या राजकीय जडणघडणीमध्ये महत्त्वाचा वाटा राहिला आहे.

Web Title: Kittenboy's son was a cabinet minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.