केएमटी वर्कशॉप घोटाळाप्रश्नी दोषारोप--११ लाखांचा घोटाळा स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 01:05 AM2017-10-05T01:05:55+5:302017-10-05T01:07:48+5:30

कोल्हापूर : केएमटी बस अपघातानंतर चालकांच्या टीकेचे प्रमुख लक्ष्य ठरलेल्या महानगरपालिकेच्या वर्कशॉप विभागाचे प्रमुख एम. डी. सावंत यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत दोषारोप निश्चित करण्यात आले

 KM workshop scam: False accusation - 11 lakh scam clear | केएमटी वर्कशॉप घोटाळाप्रश्नी दोषारोप--११ लाखांचा घोटाळा स्पष्ट

केएमटी वर्कशॉप घोटाळाप्रश्नी दोषारोप--११ लाखांचा घोटाळा स्पष्ट

Next
ठळक मुद्देविभागीय चौकशीनंतर प्रमुख एम. डी. सावंत यांच्यावर कारवाई होणार. खुलास करण्यासाठी सावंत यांना नोटीसही पंधरा दिवसांची मुदत मागून घेतली

भारत चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केएमटी बस अपघातानंतर चालकांच्या टीकेचे प्रमुख लक्ष्य ठरलेल्या महानगरपालिकेच्या वर्कशॉप विभागाचे प्रमुख एम. डी. सावंत यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत दोषारोप निश्चित करण्यात आले असून, त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. विभागीय चौकशी झाल्यानंतर सावंत यांच्यावर ठोस कारवाई होण्याची शक्यता आहे.

महानगरपालिकेकडे वर्कशॉप विभागप्रमुख म्हणून काम करताना एम. डी. सावंत यांच्यावर लोकप्रतिनिधींनी जाहीर आरोप करून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावेळी त्यांच्या कार्यकाळातील झालेल्या कथित भ्रष्टाचाराची प्राथमिक खाते चौकशी करण्यात आली. तेव्हा भीमराव मडावी, युसूफ चौगुले व आयरेकर असे तीन साक्षीदार तपासण्यात आले. सावंत यांनी नित्याच्या कर्तव्यामध्ये अक्षम्य कसुरी करणे व महानगरपालिकेच्या लौकिकास बाधा आणणे यासारखे गंभीर गैरकृत्य करून कार्यालयीन शिस्तीचा भंग केला असल्याचे स्पष्ट झाले.

प्राथमिक चौकशीवेळी शिवाजी विद्यापीठातील तांत्रिक सल्लागारांकडून सावंत यांच्याकडून झालेल्या गैरकृत्यांचे तांत्रिक लेखापरीक्षण करवून घेण्यात आले असून, त्यामध्ये अकरा लाख रुपयांचे महापालिकेचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सावंत यांच्याकडून तेवढी वसुली करण्याची शिफारस लेखापरीक्षण अहवालात करण्यात आली आहे.

सावंत यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करून दोषारोप निश्चित करण्यात आले. त्यानंतर १२ सप्टेंबर रोजी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश यांनी काढले. रचना व कार्यपद्धती विभागाचे प्रमुख संजय भोसले यांच्याकडे विभागीय चौकशीचे काम सोपविण्यात आले आहे. खुलास करण्यासाठी सावंत यांना नोटीसही देण्यात आली; परंतु सावंत यांनी कौटुंबिक कारण सांगून पंधरा दिवसांची मुदत मागून घेतली होती. ती संपली असल्याने शुक्रवारी किंवा शनिवारी त्यांची विभागीय चौकशी केली जाईल.

प्रथमच तड लागणार
महानगरपालिकेत अनेक घोटाळे झाले. विद्युत विभागातील घोटाळ्यापासून ते अलीकडे नगरसेवक भूपाल शेटे यांनी काढलेल्या टीडीआर घोटाळ्यापर्यंत बरीच प्रकरणे चर्चेत आली; पण एकाही प्रकरणाची तड लागली नाही; परंतु वर्कशॉपमध्ये झालेल्या घोटाळ्याची मात्र तड लागत आहे. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून, या घोटाळ्यास जबाबदार असणाºयांवर कारवाई करून भ्रष्टाचारास चाप लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
 

एम. डी. सावंत यांच्याविरोधात दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे या दोषारोपांना अनुसरून त्यांना काही सांगायचे असेल तर ते चौकशीच्या सुनावणीवेळी ऐकून घेतले जाईल. याकरिता आता नव्याने साक्षी-पुरावे बघण्याची आवश्यकता नाही. शुक्रवारी किंवा शनिवारी चौकशी पूर्ण होईल.
- संजय भोसले, प्रमुख, रचना व कार्यपद्धती

दो षा रो प

कंपनीकडून दरपत्रक मागवून घेऊन स्पेअर पार्टस् खरेदी करणे आवश्यक असताना तसे न करता १०० रुपयांची वस्तू १००० रुपयांस खरेदी केली.
एस्टिमेट न करता तसेच वरिष्ठांची मंजुरी न घेता कंटेनर दुरुस्ती केली. २००० रुपयांवरील खर्चाच्या ३१ बिलापोटी ५६ कंटेनर दुरुस्तीवर अवाजवी जादा
१ लाख ६९ हजार ९३१ रुपयांची रक्कम दिली.
चेस पॅच दुरुस्ती करून जमा केलेले सुरुवातीचे बिल ५९ हजार होते. त्यामध्ये दुरुस्ती करुन ४९ हजार रुपये जमा केल्याचे दिसून आले. बिल रकमेतील तफावत संशयास्पद.
पदाधिकाºयांच्या वाहनाच्या सीट कव्हर बदलण्याची कोणतीही आवश्यकता नसताना बाजारभावापेक्षा ४५,९९९ रुपयांचे रक्कम अदा केली.
स्थानिक बाजारात सात ते आठ हजार रुपयांना मिळणारी हायड्रॉलिक मोटर ३३,९७५ रुपयांना खरेदी
बूम वाहनाचा गिअर बदलण्याची आवश्यकता नसताना बाजारभावापेक्षा ४५ हजार रुपयांची रक्कम जास्त दिली गेली. विशेष म्हणजे बूमचा हा गिअर वर्कशॉपमध्ये दुरुस्त करता आला असता.

Web Title:  KM workshop scam: False accusation - 11 lakh scam clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.