‘केएमटी’ला मिळणार उत्पन्नवाढीचा ‘बूस्टर डोस’-‘पीसीआरए’मुळे होणार २ कोटींचा फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:54 AM2019-02-14T00:54:01+5:302019-02-14T00:54:45+5:30
राज्यातील सर्वच सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था तोट्यात असताना ती फायद्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून ‘पीसीआरए’ ही योजना कार्यान्वित केली. महाराष्टत कोल्हापूरसह मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या पाच शहरांची यासाठी निवड केली.
तानाजी पोवार ।
कोल्हापूर : राज्यातील सर्वच सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था तोट्यात असताना ती फायद्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून ‘पीसीआरए’ ही योजना कार्यान्वित केली. महाराष्टत कोल्हापूरसह मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या पाच शहरांची यासाठी निवड केली.
त्याअंतर्गत महानगरपालिकेच्या परिवहन (केएमटी) उपक्रमामध्ये हा प्रयोग मंगळवार (दि.१२)पासून सुरू आहे. त्यामुळे ‘केएमटी’ बसेसमधील तांत्रिक दोष कमी होऊन अॅव्हरेज वाढणार आहे. त्यामुळे वार्षिक सुमारे सव्वातीन लाख लिटर इंधनाची बचत होऊन ‘केएमटी’ला प्रतिवर्षी दोन कोटी रुपयांचा अतिरिक्त फायदा होणार आहे.
शहरात सार्वजनिक प्रवासी वाहनांपासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मिलिटरी आॅफ हौसिंग अर्बन अफेअर्स (एमओएचयूए) या केंद्र शासन अंतर्गत संस्थेच्या वतीने जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यानुसार ‘पीसीआरए’ (पेट्रोलियम कॉन्झर्व्हेशन अॅँड रिसर्च असोसिएशन) योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत वाहनांचे वायुप्रदूषण रोखण्यासाठी ‘पीसीआरए’ने ‘फ्लीट’ नावाचे सॉफ्टवेअर तयार केले. त्याच्या वापरासाठी देशभरातील एकूण ३४ शहरांची निवड केली आहे. त्यांत कोल्हापूरचा समावेश आहे. ‘पीसीआरए’ संस्थेच्या तंत्रज्ञांमार्फत तीन महिने सार्वजनिक उपक्रमांतील वाहनांची तपासणी करून वाहनांत तांत्रिक बदल करणार आहे.
कोल्हापुरात ‘केएमटी’कडे १२९ बसेस आहेत; पण रोज सरासरी साडेआठ लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. ‘पीसीआरए’ संस्थेने ‘केएमटी’कडील प्रत्येक वाहनाची मागील चार महिन्यांतील सूक्ष्म माहिती जमा केली असून, त्यावर अभ्यास केला. मंगळवारपासून योजना कार्यान्वित केली. येत्या चार दिवसांत किमान १५ बसेसची तांत्रिक दुरुस्ती करून त्या मार्गावर धावतील. ‘केएमटी’कडील जुन्या ५४ बसेसवर प्रथम हा प्रयोग सुरू आहे. त्यासाठी ‘केएमटी’च्या बुद्धगार्डन कार्यशाळेत ३५ मेकॅनिक व चालकांची कार्यशाळा झाली.
‘पीसीआरए’ म्हणजे काय?
‘पीसीआरए’मार्फत प्रवासी वाहनांची मागील तीन महिन्यांची माहिती जमा करण्यात येत आहे. ती पुढीलप्रमाणे -
१) वाहनावरील चालक २) वाहनाचा नंबर, रोजचा मार्ग
३) रोज लागणारे इंधन ४) वाहनाचे मिळणारे अॅव्हरेज
दोष निर्गत :
१) वाहनातील तांत्रिक दोष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काढता येतो.
२) चालकांत दोष आढळल्यास त्याला प्रशिक्षण देणे.
निष्कर्ष
१) वाहनांचे वायू
प्रदूषण कमी.
२) वाहनाची अॅव्हरेज वाढ.
३) ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी.
४) वाहनाची तीन ते पाच टक्के जादा इंधन बचत
इंधन बचत
बसेसना ‘पीसीआए’नुसार चालकांच्या प्रशिक्षणामुळे दरवर्षी २,२६ हजार लिटर्स, तर तांत्रिक दोष काढल्यामुळे दरवर्षी १,१३ हजार लिटर इंधनाची बचत होणार आहे.
सध्या बसेस संख्या १२९
रोज किमान १०२
बसेस मार्गस्थ
रोज २४ हजार कि.मी. धाव
जुन्या बसेसचे ३.७३, नवीन बसेसचे ४.०० (सरासरी अॅव्हरेज)