के.एम.टी.चे शिलकी अंदाजपत्रक
By admin | Published: March 22, 2017 01:02 AM2017-03-22T01:02:42+5:302017-03-22T01:02:42+5:30
तोटा कसा भरुन काढणार ? : करवीर दर्शन, वायफाय सेवा सुरू करण्याचा संकल्प
कोल्हापूर : दररोज दोन-अडीच लाख रुपयांनी तोट्यात धावणाऱ्या के.एम.टी.चे नवीन वर्षाचे एक लाख ३४ हजारांचे शिलकी अंदाजपत्रक मंगळवारी आयुक्त पी. शिवशंकर यांनी परिवहन समितीला सादर केले. शहरात महिलांकरिता खास २५ बसेस सुरू करण्याचा त्याचबरोबर करवीर दर्शन बससेवा, प्रवासी वर्गाकरिता वायफाय सेवा सुरू करण्याचा संकल्प या अंदाजपत्रकात करण्यात आला आहे.
महापालिका आयुक्त शिवशंकर यांनी मंगळवारी झालेल्या परिवहन समिती सभेत के.एम.टी. उपक्रमाचा सन २०१७-१८चा नवीन अंदाजपत्रकीय आराखडा सादर केला. यावेळी प्रभारी अतिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
नवीन अंदाजपत्रकीय आराखड्यात अव्वल शिलकेसह महसुली जमा ६९ कोटी ७९ लाख ०४ हजार आणि महसुली खर्च ६९ कोटी ७७ लाख ७० हजार असा १ लाख ३४ हजार शिलकी अंदाज तर भांडवली जमा १० कोटी ७१ लाख ५० हजार ४४३ रुपये व भांडवली खर्च १० कोटी ३५ लाख असा ३६ लाख ५० हजार ४४३ रुपयांचा शिलकी अंदाज अपेक्षित धरण्यात आला आहे. नवीन अंदाजपत्रकात महापालिकेकडून वार्षिक १४.८५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक महिन्याला सव्वा कोटी रुपयांचे अनुदान के.एम.टी.ला देण्यात येईल, असे म्हटले आहे. (प्रतिनिधी)
अंदाजपत्रकाचे वैशिष्ट्य
राज्य सरकारच्या तेजस्विनी योजनेअंतर्गत फक्त महिलांसाठी २५ बसेसद्वारे विशेष बससेवा सुरू करणार.
एमटीडीसीच्या सहकार्याने दोन करवीर दर्शन बसेस सुरू करणार.
बसेसच्या वेळापत्रकाचा काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार.
यंत्रशाळा विभागाकडे सोलर पॉवरचा प्रकल्प उभारण्यात येणार.
इंधन मायलेजसाठी आॅटोमेशन आॅफ फ्युएल सिस्टीम कार्यान्वित केली जाणार.
मोबाईल अॅपद्वारे प्रवासी नागरिकांना बसमार्ग व वेळापत्रकाची माहिती देणार.
मोबाईल अॅपद्वारे पहिल्या तीन महिन्यांत पास खरेदी करणाऱ्यांना १५ टक्के सवलत देणार.
पाच प्रमुख वाहतूक नियंत्रण केंद्रांवर मोफत ‘वायफाय’ सुविधा देण्याचे नियोजन.
उत्पन्नवाढीसाठी प्रयत्नच नाहीत
के.एम.टी. सध्या आर्थिक तोट्यात चालते. उत्पन्नवाढीसाठी ठोस उपाययोजना करण्याच्या अपेक्षा होत्या, परंतु प्रशासनाकडून तसे कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत.
त्यामुळे के.एम.टी. समोरील आर्थिक संकट कसे दूर होणार? की आहे तशीच के.एम.टी. चालणार याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. अंदाजपत्रकातील तरतुदीही जुन्याच असून त्या मागील पानावरून पुढे घेण्यात आलेल्या आहेत.
महिलांसाठी
२५ बसेस