केएमटी बस चालकावर गुन्हा, चार दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 06:19 PM2017-10-02T18:19:43+5:302017-10-02T18:29:09+5:30
गंगावेश परिसरात ताबूत विसर्जन मिरवणुकीत भरधाव केएमटी बस घुसवुन दोघांना चिरडून अठरा जणांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात सोमवारी दाखल झाला. याप्रकरणी संशयित राजाराम पांडुरंग पाटील (वय ४७, रा. सडोली म्हाळुंगे, ता. करवीर) याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यासंबधी विपुल चंद्रकांत पाटील ( २५, रा. मातंग वसाहत, राजारामपुरी, २ री गल्ली) यांनी फिर्याद दिली.
कोल्हापूर : गंगावेश परिसरात ताबूत विसर्जन मिरवणुकीत भरधाव केएमटी बस घुसवुन दोघांना चिरडून अठरा जणांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात सोमवारी दाखल झाला. याप्रकरणी संशयित राजाराम पांडुरंग पाटील (वय ४७, रा. सडोली म्हाळुंगे, ता. करवीर) याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यासंबधी विपुल चंद्रकांत पाटील ( २५, रा. मातंग वसाहत, राजारामपुरी, २ री गल्ली) यांनी फिर्याद दिली.
अधिक माहिती अशी, शहरात रविवारी सर्वत्र भक्तिमय वातावरणात ताबूत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. राजारामपुरीतील मातंग वसाहतीमध्ये तानाजी साठे यांच्या हजरत दस्तगीर बदामी पंजाची ताबूत विसर्जन मिरवणूक पापाची तिकटी ते गंगावेश मार्गे जात असताना मार्केटयार्डहून लक्षतीर्थ वसाहतीकडे निघालेली केएमटी बस मिरवणूकीत घुसली अन कल्लोळ माजला. त्यामध्ये बसखाली चिरडून तानाजी भाऊ साठे (५०), सुजल भानुदास अवघडे (१५, रा. राजारामपुरी तिसरी गल्ली, मातंग वसाहत, कोल्हापूर) यांचा दूर्देवी मृत्यू झाला. तर अठरा भाविक गंभीर जखमी झाले. यावेळी संतप्त जमावाने बससह अग्निशामक दलाच्या बंबची तोडफोड केली.
या घटनेचे गांर्भीय लक्षात घेत पोलीसांनी विपुल पाटील याची फिर्याद घेवून बस चालक रंगराव पाटील याचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयात हजर करुन बसचा नेमका अपघात कशामुळे झाला हे स्पष्ट झालेले नाही. अपघाताचे दूष्य गंभीर होते. त्यामुळे चालक मद्यप्राशन करुन होता. की बसमध्ये तांत्रिक बिघाड होती, याचा तपास करण्यासाठी आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी विनंती सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांनी न्यायालयासमोर केली. त्यावर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
‘आरटीओ’च्या अहवालानंतर कारण स्पष्ट
बसचा ब्रेक निकामी होवून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. परंतू तसा काही प्रकार झाला नसल्याचेही बोलले जाते. चालकाच्या बेफिकीरपणामुळे हा अपघात झाल्याची चर्चा आहे. त्यानुसार बसमध्ये नेमकी काय बिघाड झाला आहे, यासंबधीचे निष्कर्ष काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग (आर. टी. ओ) यांच्या ताब्यात बस दिली आहे. तेथील तज्ज्ञांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे.