कोल्हापूरहून जोतिबा, पन्हाळा मार्गावर केएमटी बससेवेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 06:01 PM2018-12-29T18:01:59+5:302018-12-29T18:05:14+5:30
राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी आणि पर्यटनवाढीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत (केएमटी) कोल्हापूरातून जोतिबा आणि पन्हाळा या दोन मार्गावर बससेवेस शनिवारपासून प्रारंभ झाला.
कोल्हापूर : राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी आणि पर्यटनवाढीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत (केएमटी) कोल्हापूरातून जोतिबा आणि पन्हाळा या दोन मार्गावर बससेवेस शनिवारपासून प्रारंभ झाला.
कोल्हापूरात सकाळी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एका समारंभात महापौर सरिता मोरे यांनी श्रीफळ वाढवून या दोन्ही बस मार्गस्थ केल्या. यावेळी परिवहन समितीचे सभापती राहुल चव्हाण, महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, परिवहन समिती सदस्य तसेच अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक आदी उपस्थित होते.
पन्हाळा बसस्थानकावर झालेल्या कार्यक्रमात नगराध्यक्षा रुपाली धडेल यांच्या उपस्थितीत बस मार्गस्थ करण्यात आली, तर जोतिबा येथे ग्रामपंचायतीच्या आवारात उपसरपंच जगन्नाथ दादर्णे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कोल्हापूरकडे जाणारी के.एम.टी. बस मार्गस्थ करण्यात आली.
कोल्हापूर बसस्थानकावरुन सकाळी ७.४५ वाजता पहिली फेरी सुटणार असून त्यानंतर १.१५, ३.१५, ५.४५ आणि रात्री ८.१५ वाजता मुक्कामाची बस मार्गस्थ होणार आहे, तर पन्हाळा येथून सकाळी ६.३0 वाजता पहिली फेरी निघणार असून त्यानंतर स. ९.00, ११.३0, ४.३0 आणि रात्री ७ वाजता शेवटची फेरी कोल्हापूरकडे निघणार आहे.
तसेच कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावरून सकाळी ८.२५ , १०.५५ , दुपारी ३ .१५ , सांय ६.२५ आणि रात्री ८.५५ वाजता मुक्कामाची बस जोतिबाकडे मार्गस्थ होणार असून जोतिबा डोंगर येथून रोज सकाळी ६.४५, ९.४० , दुपारी १२ .१०, ४ .१० आणि रात्री ७.४० वाजता ही बस कोल्हापूरकडे मार्गस्थ होणार आहे.
असा असेल मार्ग
या दोन्ही बसेस मध्यवर्ती बसस्थानकावरून रेल्वे स्टेशन मार्गे बिंदू चौक, शिवाजी पुतळा, टाऊन हॉल, शिवाजी पूल, केलीमार्गे पन्हाळा आणि जोतिबा डोंगराकडे धावणार आहे. या मार्गावरील परतीच्या प्रवासात पन्हाळा आणि जोतिबा डोंगरावरून निघालेली ही केएमटी केर्ली, शिवाजी पूल, गंगावेश, महानगरपालिका, टॉऊन हॉल, रेल्वे स्टेशनमार्गे मध्यवर्ती बसस्थानकावर पोहचणार आहे.
असे असेल तिकिट, आणि बस पास सवलत
कोल्हापूर ते पन्हाळा प्रवासासाठी ३0 रुपये तर जोतिबासाठी २८ रुपये तिकिट असणार आहे. एका दिवसाच्या पाससाठी ३५ रुपये आकारण्यात येणार आहे.
या के.एम.टी. बस सेवेमुळे भाविक, प्रवाशांना जलद व सुलभ प्रवासांची सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशी वगार्तून समाधान व्यक्त होत आहे.
महापौरांनी केला पहिला प्रवास
महापौर सरिता मोरे, राहुल चव्हाण, सुरेखा शहा, संजय सरनाईक आदींनी पन्हाळा आणि जोतिबाकडे जाणाऱ्या केएमटी बसमधून प्रथम प्रवास केला. याशिवाय पन्हाळा आणि जोतिबा येथील समारंभालाही हजेरी लावली.