कोल्हापुरात केएमटी कर्मचाऱ्यांनी पुकारला बेमुदत संप, बस सेवा ठप्प
By भारत चव्हाण | Published: March 31, 2023 04:46 PM2023-03-31T16:46:30+5:302023-03-31T16:47:01+5:30
संपामुळे केएमटी प्रशासनाचेही मोठे आर्थिक नुकसान
कोल्हापूर : केएमटी कर्मचाऱ्यांच्या म्युनिसिपल वर्कर्स युनियन विविध मागण्यांसाठी आज, शुक्रवारी बेमुदत संप पुकारला असून त्याची सुरवात पहाटे पाच वाजल्यापासून झाली. संपावर नसलेल्या मान्यताप्राप्त युनियनच्या सदस्यांनी काही बसेस बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी युनियनच्या कर्मचाऱ्यांनी हा प्रयत्न उधळून लावला. यामुळे शहरातील बससेवा ठप्प झाली होती.
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याबद्दल बेमुदत संप पुकारल्यानंतरही शुक्रवार काही मोजक्या कर्मचाऱ्यांनी केएमटी बस सेवा सुरु ठेवण्याचा प्रयत्न करताच संपावरील कर्मचाऱ्यांनी त्या बसेस बुध्द गार्डनच्या मुख्य दरवाजावर रोखल्या, एवढेच नाही तर बसेस घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळी केली. त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.
संपामुळे कोल्हापूर शहरासह ग्रामीम भागात धावणाऱ्या ६६ बसेस रस्त्यावरच आल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशी वर्गाचे शुक्रवारी चांगलेच हाल झाले. प्रवाशांना वडाप रिक्षाचा आधार घ्यावा लागला. संपामुळे केएमटी प्रशासनाचेही मोठे आर्थिक नुकसान झाले. सर्व कर्मचारी बुद्धगार्डन येथेच दिवसभर थांबून होते. त्यामुळे एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे संपास शंभर टक्के प्रतिसात मिळाला.