‘केएमटी’चा संप अखेर मागे
By Admin | Published: June 25, 2015 01:07 AM2015-06-25T01:07:04+5:302015-06-25T01:07:04+5:30
थकीत पगार भागविण्यासाठी आयुक्त कार्यालयात बैठक
कोल्हापूर : केएमटी कर्मचाऱ्यांचा मागील दोन महिन्यांचा थकलेला पगार देण्याची तजवीज महापालिका प्रशासनाने केली आहे. महापालिकेत आयुक्त पी. शिवशंकर यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक झाली. यावेळी येत्या चार दिवसांत दोन टप्प्यांत महापालिकेने एक कोटी रुपये केएमटीला पगारासाठी देण्याचे ठरले. पगाराबाबत तोडगा निघाल्याने कर्मचाऱ्यांनी बुधवारी रात्रीपासून प्रस्तावित संप मागे घेतल्याचे जाहीर केले.
केएमटीच्या कर्मचाऱ्यांचा एप्रिल व मे महिन्यांचा थकीत पगार भागविण्यासाठी आयुक्त कार्यालयात बैठक झाली. बैठकीसाठी परिवहन समितीचे सभापती अजित पोवार, राष्ट्रवादीचे गटनेता राजेश लाटकर, परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, आदी उपस्थित होते. कायम ६५० व रोजंदारीवरील ४४० अशा सर्वच कर्मचाऱ्यांचा एप्रिलचा पगार थकला आहे. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता आहे. कर्मचारी संघटनेने पगारासाठी मध्यरात्रीपासून ‘काम बंद’चा इशारा दिला होता. केएमटीला दरमहा पगारासाठी एक कोटी वीस लाख रुपये लागतात. यातील कपात वजा जाता निव्वळ पगारापोटी ८० लाख रुपयांची गरज असते. एप्रिल महिन्यातील थकीत पगारासाठी केएमटीला २८ लाख रुपये, तर मार्च महिन्याच्या पगारासाठी ८० लाख रुपयांची गरज आहे. महापालिका प्रशासन आता एक कोटी रुपये देणार असून उर्वरित रकमेची जोडणी केएमटी प्रशासन करणार असल्याचे संजय भोसले यांनी सांगितले.
इच्छुकांची वारी चुकणार !
ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांची यंदाची पंढरीची वारी चुकणार आहे. वारीच्या कालावधीतच अखंड निवडणुकीचा कार्यक्रम असल्याने त्यांची गोची होणार आहे.
मतदानाचा टक्का घटणार
जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी ईर्ष्येने उच्चांकी मतदान होते; पण यंदा वारीत निवडणूक आल्याने मतदानाचा टक्का घटणार हे निश्चित आहे. निवडणुका लागलेल्या गावांपैकी बहुतांश गावे ही वारकरी संप्रदायातील असल्याने त्याचा फटका मतदानाला बसू शकतो.