केएमटी बसखाली सापडून शिक्षीका ठार
By admin | Published: July 1, 2017 06:29 PM2017-07-01T18:29:58+5:302017-07-01T18:29:58+5:30
मंगळवार पेठ पाण्याचा खजिना येथील घटना
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0१ : मंगळवार पेठ पाण्याचा खजिना येथे केएमटी बसखाली सापडून शिक्षीका जागीच ठार झाली. राधिका नरेंद्र तेरदाळ (वय ५०, रा. काटकर माळ, मुळ गाव अथणी, जि. बेळगाव) असे त्यांचे नाव आहे.
बसच्या पाठिमागील बाजूचा मोपेडला धक्का बसून त्या थेट चाकाखाली गेल्याने ही दूर्देवी घटना घडली. शनिवारी दूपारी साडेबाराच्या सुमारास घडलेल्या या अपघाताने या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प होती. अधिक माहिती अशी, राधिका तेरदाळ ह्या सुर्वेनगर, कळंबा येथील महावीर इंग्लीश स्कुलमध्ये शिक्षीका होत्या. नेहमीप्रमाणे शनिवारी त्या सकाळी शाळेत गेल्या होत्या. दूपारी बारा वाजता शाळा सुटल्यानंतर घरी जाताना पार्श्वनाथ बँकेत जाण्यासाठी त्या मोपेडवरुन संभाजीनगरहून मंगळवार पेठेत येत होत्या.
पाण्याच्या खजिन्या समोर येताच राज्योपाध्येनगरहून मध्यवर्ती बसस्थानककडे जाणाऱ्या केएमटी बसला (एम. एच. ०९ सीव्ही ०४७६) त्या उजव्या बाजूने ओव्हरटेक करुन जात असताना बसचा पाठिमागील बाजूचा धक्का मोपेडला बसल्याने त्या थेट चाकाखाली गेल्या. तर मोपेड बाजूला पडली. त्यांच्या डोक्याला धडकून चाक गेल्याने अतिरक्तस्त्रावाने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या मार्गावर नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर होती. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली.
शासकीय रुग्णवाहीकेतून त्यांचा मृतदेह सीपीआरच्या अपघात विभागात आनला. तेरदाळ यांच्या पश्चात पती व मुलगी असा परिवार आहे. याबाबत जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली. पतीचा अक्रोश राधिका तेरदाळ यांचे पती खासगी नोकरी करतात. त्यांना अपघाताची माहिती समजताच ते तत्काळ सीपीआरमध्ये आले. येथील डॉक्टरांनी त्यांना मृतदेह दाखविला. त्यानंतर त्यांची पर्स, अंगावरील दागिने त्यांच्या हातात दिले. हे सर्व पाहून त्यांनी केलेला आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता.