मोर्चेकऱ्यांच्या सेवेसाठी ‘केएमटी’ सज्ज
By admin | Published: September 27, 2016 12:26 AM2016-09-27T00:26:52+5:302016-09-27T00:44:49+5:30
पन्नास बसेस तैनात : शहराच्या वेशीवरील दहा ठिकाणांपासून मोर्चात सहभागी होणाऱ्यांची करणार ने-आण
कोल्हापूर : कोल्हापुरात १५ आॅक्टोबरला निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी होणाऱ्या मोर्चेकऱ्यांना ने-आण करण्याकरिता ‘केएमटी’च्या खास ५० बसेस तैनात करण्यात येणार आहेत. शहराच्या वेशीवर दहा ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या पार्किंगस्थळांपासून ते मोर्चाच्या ठिकाणापर्यंत मोर्चेकऱ्यांना आणून सोडण्याची, तसेच मोर्चा संपल्यानंतर परत घेऊन जाण्याची जबाबदारी ‘केएमटी’वर सोपविण्यात येत असून, प्रशासनाने ही जबाबदारी स्वीकारली आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे स्थानिक संयोजक आणि आयुक्त पी. शिवशंकर, तसेच केएमटीचे अधिकारी यांच्यात या संदर्भात दोन वेळा बैठक झाली असून, केएमटीने बसेस देण्याचे मान्य केले आहे. किती बसेस लागणार, पैसे किती भरणार, फेरीनिहाय भाडे घ्यायचे की प्रवासी तिकिटानुसार भाडे घ्यायचे यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
मोर्चाच्या संयोजकांनी अद्याप पार्किंगस्थळे निश्चित केलेली नाहीत. किमान दहा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करावी लागेल, असा अंदाज आहे. त्यामुळे तेथून मोर्चेकऱ्यांना मोर्चाची जेथून सुरुवात होणार आहे तेथेपर्यंत सोडायचे आणि मोर्चा संपल्यानंतर परत पार्किंगस्थळापर्यंत नेऊन सोडावे लागणार आहे. केएमटी प्रशासनाने या कामास तत्त्वत: मान्यता दिली असून, फक्त पैसे भरण्याचा मुद्द्यावर निर्णय होणे बाकी आहे.
केएमटीच्या ११० बसेस पहाटे पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत रस्त्यावर धावत असतात. दररोज किमान एक लाख २५ हजार प्रवासी बसमधून प्रवास करतात; परंतु १५ आॅक्टोबरच्या मोर्चावेळी ही संख्या किमान तिप्पट होण्याची शक्यता आहे. शिवाय एका फेरीत किती प्रवासी बसावेत, यावर कोणाचे नियंत्रण असणार नाही. त्यामुळेच केएमटीचे अधिकारी त्याचे नियोजन करीत आहेत. (प्रतिनिधी)
पैसे नकोत, वस्तू द्या...
मोर्चाच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी २५ हजारांपासून १० लाखांपर्यंत पैसे देण्याचे जाहीर केले आहे; परंतु नियोजन समितीने या पैशापेक्षा मोर्चासाठी उपयोगी पडणाऱ्या वस्तू द्याव्यात, असे आवाहन केले आहे. भगवे झेंडे, बॅनर, स्टीकर, टी शर्ट, महिलांसाठी टोप्या अशा वस्तू आवश्यक आहेत. जाहीर केलेल्या रकमेइतक्या वस्तू संबंधितांनी द्याव्यात, असे समितीतर्फे कळविले जात आहे.
मोर्चाच्या दिवशीचा पेपर होणार रविवारी
कोल्हापूर : कोल्हापुरातील मराठा क्रांती मूक मोर्चाच्या दिवशीचा पेपर दुसऱ्या दिवशी (रविवारी) घेण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१६ मध्ये होणाऱ्या हिवाळी सत्रातील विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा दि. १४ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहेत. कोल्हापूरसह सांगली व सातारा जिल्ह्यांत या परीक्षा होतील. जिल्ह्यात दि. १५ आॅक्टोबरला मराठा क्रांती मूक मोर्चा होणार आहे. या मोर्चाच्या आयोजनाची व्याप्ती विचारात घेऊन मोर्चाच्या दिवशी होणारे कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे पेपर दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. १६) होतील. हे पेपर रविवारी निर्धारित वेळेत नियोजित परीक्षा केंद्रांवर होतील. या वेळापत्रकातील बदलाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात यावी, अशी सूचना विद्यापीठाने महाविद्यालय आणि विद्यापीठातील अधिविभागांना सोमवारी पत्राद्वारे दिली आहे.
मराठा मोर्चाचे ठिकाण तूर्तास गांधी मैदानच
कोल्हापूर : १५ आॅक्टोबरला कोल्हापुरात निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी निवडलेले गांधी मैदान हे मध्यवर्ती ठिकाण तूर्त तरी कायमच आहे; परंतु जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांसह सीमाभागातून येणाऱ्या लोकांची गर्दी पाहता शहराबाहेरील तपोवन व शेंडा पार्क या मैदानांचे पर्याय समोर आले आहेत. याबाबत सकल मराठा क्रांती मोर्चा समिती लवकर पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन चर्चा करूनच सर्वमान्य निर्णय घेण्याची शक्यता आहे.
शिव-शाहूंची भूमी असलेल्या कोल्हापूरमधून होणाऱ्या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. येथील मोर्चाही ‘न भूतो, न भविष्यती’ असा करायचाच, असा निर्धार मराठा बांधवांनी करून त्यासाठी कंबर कसली आहे. शिवाजी पेठेतील गांधी मैदान येथून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. तूर्त तरी गांधी मैदान हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने तेच ठिकाण गृहीत धरून नियोजन सुरू आहे; परंतु मोर्चासाठी येणाऱ्या लोकांची प्रचंड संख्या पाहता, गांधी मैदानाची जागा अपुरी पडू शकते, त्यामुळे शहराबाहेरील तपोवन व शेंडा पार्क या मैदानांचा पर्याय समोर आला आहे. त्यावर नियोजन समितीच्या पातळीवरही बैठकांच्या माध्यमातून विचार सुरू आहे; परंतु अद्याप कुठलाही अंतिम निर्णय घेतलेला नाही. पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासनासमवेत बैठक घेऊन या ठिकाणाबरोबरच पर्यायी ठिकाणांचे मोर्चेकऱ्यांसाठी होणारे फायदे-तोटे याबाबत चर्चा केली जाणार आहे. (प्रतिनिधी)