केएमटीने जुन्या बसेस स्क्रॅप कराव्यात, अन्यथा बंदोबस्त करु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 05:10 PM2017-10-04T17:10:46+5:302017-10-04T17:16:40+5:30
केएमटीकडील आयुष्यमान संपलेल्या जुन्या गाड्या महानगरपालिका प्रशासनाने तातडीने बंद कराव्यात, अन्यथा आम्हाला त्याचा बंदोबस्त करावा लागेल, असा गंभीर इशारा येथील नॅशनल ब्लॅक पॅँथर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दिला. अतिरीक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना त्यांच्या कार्यालयातच ठाण मारुन ठोस आश्वासन दिल्याखेरीज कार्यालयातून बाहेर जाणार नाही असा इशारा दिल्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.
कोल्हापूर : केएमटीकडील आयुष्यमान संपलेल्या जुन्या गाड्या महानगरपालिका प्रशासनाने तातडीने बंद कराव्यात, अन्यथा आम्हाला त्याचा बंदोबस्त करावा लागेल, असा गंभीर इशारा येथील नॅशनल ब्लॅक पॅँथर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दिला. अतिरीक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना त्यांच्या कार्यालयातच ठाण मारुन ठोस आश्वासन दिल्याखेरीज कार्यालयातून बाहेर जाणार नाही असा इशारा दिल्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.
सकाळी अकरा वाजता नॅशनल ब्लॅक पॅँथर पक्षाचे कार्यकर्ते आयुक्त अभिजित चौधरी यांच्या कार्यालयात गेले. पण कार्यालयात आयुक्त नसल्याने अतिरीक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी त्यांची भेट घेतली व त्यांचे निवेदन स्वीकारले. तसेच त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
आयुष्यमान संपलेल्या बसेस चोवीस तासात बंद कराव्यात अन्यथा त्यामुळे समाजात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी मनपा अधिकाऱ्यांवर राहिल, असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. अपघातास जबाबदार असणाºया चालकांसह अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे असा आग्रह धरताना अपघात होऊन तीन दिवस होऊन गेले कसली चौकशी करताय अशी विचारणा कार्यकर्त्यांनी केली. अपघातातील मयतांच्या वारसांना सेवेत सामावून घ्या अशी मागणी केली.
कार्यकर्त्यांनी आमच्या मागण्याबाबत लेखी पत्र देण्याची मागणी अतिरीक्त आयुक्तांकडे केली. तथापि आयुक्तांशी चर्चा करुन निर्णय घेतो असे पाटणकर यांनी सांगताच कार्यकर्त्यांनी त्यांना अपशब्द वापरले. त्यावेळी पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी कार्यकर्त्यांना समजावले. शांततेत आपले म्हणणे मांडा.
चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक दोष तपासले जात आहे. अपघाताची चौकशी सुरु आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यात लक्ष घातले आहे,त्यामुळे शांतपणे आपले म्हणणे मांडा असे सावंत यांनी समजावले.
चौकशी अहवाल येताच सर्व संबंधितांवर कारवाई करण्याबाबत आयुक्तांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे लेखी पत्र पाटणकर यांनी कार्यकर्त्यांना दिले. त्यावेळी दुपारी अडीच वाजता कार्यकर्ते तेथून बाहेर पडले.
यावेळी सहायक शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, सहायक आयुक्त मंगेश शिंदे, संजय भोसले , संजय सरनाईक उपस्थित होते. तर अतिरीक्त आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात जीवनसिंग, अभिनंदन राव, ताहिर इनामदार, शंभू महापुरे, इजाज शेख, राकेश कांबळे, किरण जासूद यांचा समावेश होता.