केएमटीचा ‘गाडा’ तोट्यातच!
By admin | Published: June 16, 2016 12:29 AM2016-06-16T00:29:12+5:302016-06-16T00:58:19+5:30
नव्या बसेसना वर्ष पूर्ण : दररोज दोन लाखांच्या उत्पन्नाला फटका
तानाजी पोवार --कोल्हापूर --जुन्या बसेसवर वारंवार होणारा दुरुस्ती खर्च हा आवाक्याबाहेर गेल्याने नव्या बसेस ताफ्यात दाखल झाल्यास ‘केएमटी’चा तोटा कमी होऊन महापालिकेच्या परिवहन विभागाला ऊर्जितावस्था येईल, अशी अपेक्षा फोल ठरली आहे; नव्या ७५ बसेस ताफ्यात येऊन सुमारे वर्ष उलटले तरीही प्रतिदिनी तोटा वाढतच आहे. त्यामुळे केएमटीला पहिल्यापेक्षा जादा घरघर लागली आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रतिदिनी सुमारे दोन लाख रुपये तोट्याला सामोरे जावे लागत असल्यामुळे त्याचा परिणाम केएमटी कर्मचाऱ्यांच्या पगारावर होऊ लागला आहे.
दोन वर्षांपूर्वी केएमटी प्रशासनाने काही बसेस भाडेपट्टीवर घेऊन या उपक्रमाला चालना देण्याचा प्रयत्न केला; पण त्यामुळे केएमटीच्या तोट्यात फरक पडला नाही. जुन्या बसेसच्या दुरुस्तीवर येणारा खर्च आणि डिझेलचा खर्च परिवहन विभागाला परवडेना झाला. त्यामुळे प्रतिदिनी सुमारे दीड लाख रुपयांचा तोटा होत होता. नव्या बसेस ताफ्यात दाखल झाल्यास दुरुस्तीवरील खर्च कमी होईल, अशी अपेक्षा प्रशासनाने केली. त्यामुळे पूर्वीच्या १०० बसेसपैकी सुमारे ५१ बसेस स्क्रॅप केल्या. मे २०१६ मध्ये नव्या ७५ बसेसची भर पडली. नव्या बसेसमुळे मागील वर्षाच्या तुलनेत तोटा किमान ५० हजारांनी कमी झाला; पण सध्या एकूण १२९ बसेसपैकी सुमारे ११० बसेस धावत आहेत. नव्या बसेस येऊन वर्ष लोटले तरीही तोटा कमी होण्यापेक्षा वाढतच आहे.
सध्या केएमटीपासून प्रतिदिन सुमारे सात लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर उत्पन्नात भर पडेल, अशी अपेक्षा असून ते उत्पन्न पुढील महिन्यात प्रतिदिनी आठ लाख रुपयांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे; पण किमान साडेनऊ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न पोहोचले तर केएमटी नफ्यात येईल, असाही विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
नव्या २९ बसेस ताफ्यात येणार
गतवर्षी काही तांत्रिक कारणांस्तव राहिलेल्या सुमारे २९ बसेस लवकरच ताफ्यात समाविष्ट होणार आहेत. केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून येणाऱ्या निधीतून या बसेस खरेदी करण्यात येत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या १२९ व नव्या येणाऱ्या २९ बसेसमुळे ही संख्या एकूण १५८ होणार आहे.