‘केएमटी’चा प्रवास होणार स्वस्त
By Admin | Published: January 4, 2015 01:18 AM2015-01-04T01:18:37+5:302015-01-04T01:20:11+5:30
प्रस्ताव सादर : परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर अंमलबजावणी; स्टेजमागे रुपया होणार कमी
भारत चव्हाण / कोल्हापूर
डिझेलचे उतरलेले दर आणि खासगी वडापशी स्पर्धा या दोन प्रमुख कारणांमुळे केएमटी प्रशासनाने शहरवासीयांचा बस वाहतुकीचा प्रवास स्वस्त करण्याचे ठरविले. भाड्याचे दर कमी करण्यासंदर्भातील प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे मंजुरीकरिता पाठविला असून, मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
गेल्या सहा महिन्यांत डिझेलचे दर सात ते आठ रुपयांनी कमी झाले. त्यामुळे केएमटी प्रशासनानेही बसभाड्याचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रशासनाने पूर्ण अभ्यास करून प्रस्ताव तयार केला. पहिल्या व दुसऱ्या स्टेजपर्यंतचे भाडे कमी करण्याचा त्यामध्ये समावेश आहे. केएमटीने भाडे कमी करण्याचा निर्णय घेतला असला, तरी तसा प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठविला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत या प्रस्तावास मंजुरी मिळणे अपेक्षित होते. चार दिवसांत ती मिळण्याची शक्यता आहे. स्टेजला रुपयापर्यंत प्रवास स्वस्त होईल, असे सांगण्यात आले.
केएमटी प्रशासनाने आतापर्यंत दरवाढचेच प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठविले होते; परंतु प्रथमच दर कमी करण्यास परवानगी बाबत प्रस्ताव पाठविला. केएमटीच्या बसफेऱ्या कमी करून नुकसानीतील मार्ग बंद केले. सध्या वडाप रिक्षाबरोबर केएमटीची स्पर्धा आहे. जेथे बसथांबे तेथेच ‘वडाप’चेही थांबे आहेत आणि वडाप वाहतुकीला प्रतिबंध करणे केएमटीला अद्याप तरी जमले नाही.