देशासमोरील धोके ओळखून प्रबोधन व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:51 AM2018-04-02T00:51:40+5:302018-04-02T00:51:40+5:30
शिरोळ : देशासमोरील संभाव्य धोके ओळखून शिक्षण व सहकार क्षेत्रातील मंडळींनी देश पातळीवरील चर्चासत्रातून प्रबोधन केले पाहिजे, असे आवाहन माजी राष्टÑपती प्रतिभाताई पाटील यांनी केले.
शिरोळ येथील श्री दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार स्व.डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त रविवारी माजी राष्टÑपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते यंदाचा स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना माजी राष्टÑपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. १ लाख १ हजार १११ रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कारखाना कार्यस्थळावर हा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, आमदार सतेज पाटील, राजू कागे, माजी खासदार निवेदिता माने, कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, माजी आमदार काका पाटील, कल्लाप्पाण्णा मग्याण्णावर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, कोल्हापूरच्या महापौर स्वाती यवलुजे, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. नीता माने, नगराध्यक्ष जयराम पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, अशोकराव कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी राष्टÑपती पाटील म्हणाल्या, शिक्षणामुळे सद्गुणांचा गुणाकार आणि दुर्गुणांची वजाबाकी अशी शिक्षणपद्धती अवलंबणे गरजेचे आहे. विज्ञान, तंत्रज्ञान व प्रगती यांचा प्रचार व प्रसार जनकल्याणासाठी झाला पाहिजे. स्व. सा. रे. पाटील यांनी नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दत्त उद्योग समूहाचा परिसर फुलविला आहे. त्यांचा वसा व वारसा त्यांचे पुत्र गणपतराव पाटील पुढे चालवीत आहेत. डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य शिक्षण, आरोग्य क्षेत्राच्या माध्यमातून चिरंतन राहणार आहेत.
दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी स्वागत केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, स्व. सा. रे. पाटील यांनी समाजविकासाचे केलेले काम लक्षणीय आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य अतुलनीय आहे. तरुणाला उच्च शिक्षणातून रोजगार व देशाला संपत्ती मिळाली तरच देश महासत्ताकडे वाटचाल करेल.
‘लोकमत’ नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार म्हणाले, समाजात मतासाठी धर्म, पंथ यांचा आधार घेतला जात आहे. हा देश बहुजनांचा आहे. शिक्षणात दुकानदारी आणि सहकार मोडून पडत आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांना मिळालेला पुरस्कार आमच्यासाठी आत डोकावून पाहण्याचा आणि स्वत:ची परीक्षा घेण्यासाठी आहे.
विनोद शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले. इचलकरंजीचे बाळ महाराज यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. राजश्री पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी मासिक इंद्रधनुष्यच्या कॅन्सर विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष सिदगोंडा पाटील, संचालक अनिल यादव, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव बी. बी. शिंदे, शेतकरी उपस्थित होते. जि. प.चे सदस्य बंडा माने यांनी आभार मानले.
पुरस्काराची रक्कम सेवाभावी कार्याला
डॉ. पाटील म्हणाले, राजकारणात फार वेळ न राहता राज्यपाल होण्याचे माझे स्वप्न तत्कालीन राष्टÑपती प्रतिभाताई पाटील व सोनिया गांधी यांच्यामुळे पूर्ण झाले. त्यांनी पुरस्काराची एक लाखांची रक्कम परत देत अंध, मूकबधिर सेवाभावी संस्थांच्या कार्याला खर्च करावी, असे सांगितले.