जाणून घ्या कुठल्या महिन्याला ‘अधिक मास’ म्हणतात, काय आहे या महिन्याचे वैशिष्ट्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:21 PM2018-05-19T13:21:00+5:302018-05-19T13:24:25+5:30
हिंदू पंचांगानुसार दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्याला बुधवारपासून प्रारंभ झाला. या महिन्याला पुरुषोत्तम मास, धोंडा महिना असेही म्हटले जाते. यंदा १३ जूनपर्यंत अधिक मास असून, या कालावधीत अधिकाधिक देवधर्म व विष्णूची आराधना केली जाते; तर मुलीला आणि जावयाला अधिक वाण देण्याची पद्धत आहे.
कोल्हापूर : हिंदू पंचांगानुसार दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्याला बुधवारपासून प्रारंभ झाला. या महिन्याला पुरुषोत्तम मास, धोंडा महिना असेही म्हटले जाते. यंदा १३ जूनपर्यंत अधिक मास असून, या कालावधीत अधिकाधिक देवधर्म व विष्णूची आराधना केली जाते; तर मुलीला आणि जावयाला अधिक वाण देण्याची पद्धत आहे.
पृथ्वीच्या सूर्यार्भोवतीच्या भ्रमणाला ३६५ दिवस, ५ तास ४८ मिनिटे आणि साडे ४७ सेकंद लागतात. त्या काळात इंग्रजी (ग्रेगरी) कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चांद्र महिने ११ दिवस आधीच पूर्ण होतात.
हिंदू पंचांगानुसार ज्या महिन्यात सूर्य एकाही राशीचे संक्रमण करीत नाही, त्या महिन्याला ‘अधिक मास’ म्हणतात. सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालून या अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाचा समावेश करण्यात आला. या महिन्यामुळे तीन वर्षांत होणारा ३३ दिवसांचा फरक भरून निघत कालगणना सौरवर्षाशी जुळविली जाते.
या महिन्याला पौराणिक कथेचीही जोड देण्यात आली आहे. या महिन्यात मंगल कार्ये केली जात नसल्याने या महिन्याला इहलोकात निर्भर्त्सनेला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्याने वैकुंठात विष्णूकडे गाºहाणे मांडले.
विष्णूने त्याला गोकुळात कृष्णाकडे पाठविले. कृष्णाने या महिन्याचे नाव बदलून ‘पुरुषोत्तम मास’ असे ठेवले व या महिन्यात जे लोक श्रद्धा व भक्तीने उपासना, व्रत व दान करतील त्यांना पुण्य मिळेल, असे वचन दिले, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या कालावधीत श्री विष्णूची आराधना, तीर्थाटन, देवधर्म, व्रतवैकल्ये केली जातात. दानधर्म करण्यावर भर दिला जातो.
जावयाचा मान
या महिन्यात मुलीला आणि जावयाला अधिक वाण देण्याची पद्धत आहे. पहिल्या अधिक मासाला चांदीच्या ताटात ३३ अनारसे किंवा बत्तासे ठेवून, त्यांत दिवा लावून जावयाला वाण दिले जाते. शिवाय कपडे, दागिने, भांडीस्वरूपात वस्तू भेट दिल्या जातात. त्यामुळे मिठाईच्या दुकानात अनारसे, बत्तासे, म्हैसूरपाक हे पदार्थ दिसू लागले आहेत. सुवर्णपेढ्यांमध्ये चांदीचे तबक, चांदीचे दिवे, लक्ष्मीनारायण देवाची मूर्ती, मुलीसाठी जोडवी यांची मांडणी करण्यात आली आहे.