‘गुड टच- बॅड टच’ कळेल तर मुलांचे लैंगिक शोषण टळेल!, पालकांची भूमिका महत्त्वाची
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 01:15 PM2022-03-16T13:15:05+5:302022-03-16T13:40:14+5:30
पालकांचे मुलांसोबतचे नाते अतिशय घट्ट असणे आवश्यक आहे. या गोष्टी मुलांना समजावून सांगितल्यास मुलांचा आत्मविश्वास वाढेल व लैंगिक शोषणालाही आळा बसेल.
तानाजी पोवार
कोल्हापूर : सध्या लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे, त्यातच अल्पवयीन मुलांवरीलही वाढते अत्याचार ही गंभीर समस्या बनली आहे. त्यासाठी मुलांना ‘गुड टच आणि बॅड टच’ समजावून सांगण्याची जबाबदारी आता पालकांवर आली आहे. त्यासाठी पालकांचे मुलांसोबतचे नाते अतिशय घट्ट असणे आवश्यक आहे. या गोष्टी मुलांना समजावून सांगितल्यास मुलांचा आत्मविश्वास वाढेल व लैंगिक शोषणालाही आळा बसेल. वर्षभरात लैंगिक अत्याचार व विनयभंगाच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
पालकांनी आपल्या मुलांना विश्वासात घेऊन काही गोष्टींचा उलगडा केल्यास अत्याचाराच्या प्रकाराला निश्चितच आळा बसेल. मुलांच्या सुरक्षेसाठी खरे तर पालकांनीच पावले उचलणे आवश्यक आहे. पालकांनी अशा गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास कालांतराने पश्चात्तापाशिवाय हाती काहीच उरत नाही. त्यामुळे सध्या पालकांनी मुलांबाबत सतर्कता बाळगण्याची गरज आहे. लहान मुलांवर वाईट नजर ठेवणारा व्यक्ती हा गुन्ह्याची सुरुवात वाईट स्पर्शापासूनच करतो. तोच स्पर्श मुलांना समजण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत मुले अवगत असतील तर या घटना टाळता येतात.
‘गुड टच’ची माहिती आवश्यक
एखादी व्यक्ती ही तुमच्या अंगाला स्पर्श करते, त्यातून प्रेमाची भावना व्यक्त होते, त्यावेळी चांगले वाटते, तो स्पर्श सुरक्षित वाटतो, असा स्पर्श चांगला समजावा. मुलांना या गोष्टीचे ज्ञान देण्याची जबाबदारी पालकांची आहे. वेळप्रसंगी त्यांना स्पर्श करून दाखवा. एखाद्या व्यक्तीचा स्पर्श त्रासदायक वाटत असेल तर त्यापासून बाजूला व्हावे.
‘बॅड टच’ समजावून सांगावेत
‘गुड टच’च्या विरोधात ‘बॅड टच’ असतो. एखाद्याने स्पर्श केला तर त्याचा त्रास होतो अगर वाईट वाटते, तो स्पर्श ‘बॅड टच’ समजावा. मुलांना विश्वासात घेऊन असे ‘बॅट टच’ नीट समाजावून सांगावेत. आपल्या काही खासगी अवयवांना चांगला व्यक्ती कधीही स्पर्श करत नाही, अशा अवयवांची माहिती मुलांना समजावून सांगताना पालकांनी लाज बाळगू नये; पण त्यांना ही माहिती विश्वासात घेऊनच सांगावी.
२०२१ मधील अत्याचार
- एकूण लैंगिक अत्याचार - १७८
- अल्पवयीनवरील अत्याचार - ८४
- एकूण विनयभंग - ३४९
- अल्पवयीनवर अत्याचार - १७०