रहिमत खाँ यांची कबर अस्वच्छतेच्या विळख्यात
By Admin | Published: June 23, 2016 12:49 AM2016-06-23T00:49:07+5:302016-06-23T01:06:15+5:30
संस्थानकालीन गायक : कुरुंदवाड नगरपालिकेचे दुर्लक्ष; संगीत प्रेमींतून तीव्र नाराजी
गणपती कोळी -- कुरुंदवाड --संस्थानकालीन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रीय संगीताचे गायक भूगंधर्व रहिमत खाँ यांची कबर दुर्लक्षित झाली असून, अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे़ त्यामुळे संगीत प्रेमींतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे़ २४ जून भूगंधर्व रहिमत खाँ यांचा स्मृतिदिन असून, यानिमित्ताने तर पालिका प्रशासनाला स्वच्छतेसाठी जाग येणार का? असा सवाल शहरवासीयांतून व्यक्त होत आहे़
कुरुंदवाड हे संस्थानकालीन शहर असून, पटवर्धन सरकार यांचे राज्य होते़ त्यामुळे येथील राज दरबारात कलाकार, संगीतकार, पैलवान यांना आश्रय देऊन त्यांचा मानसन्मान ठेवला जात असे़ भूगंधर्व रहिमत खाँ हे मूळचे ग्वाल्हेरचे असून, त्यांचे वडील हुदुखाँसाहेब यांच्या मृत्यूनंतर घरचे दारिद्र्य व कौटुंबिक कलहातून रहिमत खाँ यांनी घर सोडले़ गायन करीत फिरत असताना कुरुंदवाडचे सुपुत्र व भारतीय सर्कसचे जनक विष्णुपंत छत्रे यांच्याशी १८९२ साली वाराणसीत भेट झाली़
विष्णुपंत छत्रे यांनी सर्कशीत रहिमत खाँ यांच्या संगीत गायनाचा कार्यक्रम घेत त्यांना कुरुंदवाडचे सरकार आण्णासाहेब पटवर्धन यांच्या दरबारात घेऊन आले़ रहिमत खाँ यांचे संगीत व गायन ऐकून पटवर्धन सरकार यांनी दरबारी गायक म्हणून त्यांची नेमणूक केली़ त्यांना मानपानाबरोबर राहण्याची, भोजनाची व्यवस्था येथील पोलिस ठाण्यासमोरील घोरपडे यांच्या इमारतीमध्ये केली़ त्यांच्या दिमतीला नोकरही ठेवण्यात आला होता़
येथील राजवाड्यामध्ये गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असे़ त्यामध्ये भूगंधर्व रहिमत खाँ यांच्या शास्त्रीय संगीत गायनाचा कार्यक्रम होत असे़ त्या काळात रहिमत खाँ व इचलकरंजीच्या बाळकृष्णबुवा यांचा जुगलबंदी कार्यक्रम सुमारे साडेसहा तास रंगल्याचा इतिहास आहे़
अशा या भूगंधर्व यांचा २४ जून १९२२ रोजी मृत्यू झाला़ संस्थानिक पटवर्धन सरकार यांनी येथील दौलतशहावली दर्ग्याच्या पिछाडीस दफन देऊन कबर बांधली आहे़ मात्र, संस्थानिकानंतर या आंतरराष्ट्रीय भूगंधर्वाच्या कबरीकडे दुर्लक्ष झाले आहे़ परिसर अस्वच्छतेच्या गर्तेत सापडला आहे़ याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने साहित्यिक व संगीत प्रेमींतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़ भूगंधर्व यांचा २४ जून रोजी स्मृतिदिन आहे़ त्यानिमित्ताने तरी पालिका प्रशासनाने लक्ष देऊन परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी संगीत प्रेमींतून होत आहे.
दरबारातील संगीतरत्न
सम्राट अकबरच्या दरबारातील मियाँ तानसेन यांच्यानंतर २५० वर्षांनी ज्यांची कीर्ती उत्तर भारतातून दक्षिणेकडे येऊन पोहोचली़ त्यामध्ये स्थाल गायकीचा श्रेष्ठ दर्जा निर्माण करणारे रहिमत खाँ पटवर्धन सरकार यांच्या दरबारातील संगीतरत्न होते़ तानसेनच्या महान परंपरेतील शेवटचे गायक असा त्यांचा त्याकाळी गौरवपूर्ण उल्लेख केला जात असे़ अशा महान संगीत गायकाच्या कबरीला पंडित भीमसेन जोशींसह अनेक दिग्गजांनी व रसिकांनी भेट दिली आहे़