ज्ञानकेंद्रित उद्योगासाठी कौशल्य हवे
By Admin | Published: December 15, 2015 12:13 AM2015-12-15T00:13:34+5:302015-12-15T00:28:16+5:30
‘गोशिमा’ची वार्षिक सभा : विजय ककडे यांचे व्याख्यान; मान्यवरांची उपस्थिती
कोल्हापूर : लोकशाही आणि युवा लोकसंख्येचा वापर करून ज्ञानकेंद्रित उद्योग-व्यवसाय विस्तारण्याची संधी आहे. त्यासाठी कौशल्य व शिक्षण यांचा वापर आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. विजय ककडे यांनी रविवारी येथे केले.येथील मधुसूदन हॉलमध्ये झालेल्या गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘भारतीय अर्थव्यवस्था, उद्योगांसमोरील आव्हाने’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. डॉ. ककडे म्हणाले, जागतिक अर्थव्यवस्थेचे भारताच्या विकासावर लक्ष असून, सन २०५० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था चीननंतर दुसऱ्या क्रमांकाची असेल, असे अंदाज आहेत. कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्याचे आव्हान आहे. त्यसाठी औद्योगिक संस्था आणि विद्यापीठे यांनी एकत्रित कार्यरत राहणे आवश्यक आहे. चीनने उद्योगांना प्रोत्साहित केले, तसेच आता आर्थिक सुधारणांच्या दुसऱ्या टप्प्यात आवश्यक आहे. स्कील इंडिया व मेक इन इंडिया एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, त्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील प्रयत्न महत्त्वाचे आहेत. माजी अध्यक्ष अजित आजरी म्हणाले, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ब्लॉक वाईज मिटिंग सुरू केली. शासन दरबारी तक्रारी मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमात ज्येष्ठ उद्योजक किरण पाटील यांची ‘गोशिमा’च्या फौंड्री सबक्लस्टरच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली. ‘गोशिमा’मध्ये सभागृह बांधण्यासाठी मदत करणारे ज्येष्ठ उद्योजक वसंत भट यांचा प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी रामप्रताप झंवर, बाबाभाई वसा, ‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन, ‘मॅक’चे अध्यक्ष संजय जोशी, इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष संजय आंगडी, उपाध्यक्ष बाबासो कोंडेकर, ‘गोशिमा’चे माजी अध्यक्ष उदय दुधाणे, चंद्रकांत जाधव, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एस. एस. वराळे, उपअभियंता संजय जोशी, सचिन शिरगावकर, मोहन मुल्हेरकर, आर. पी. पाटील, योगेश कुलकर्णी, श्रीकांत पोतनीस, जे. बी. अनघोळकर, संग्राम पाटील, प्रदीपभाई कापडिया, आदी उपस्थित होते. जे. आर. मोटवाणी यांनी स्वागत केले. मोहन पंडितराव यांनी सूत्रसंचालन केले. सुरजितसिंग पवार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
कर्नाटकसाठी ४५० उद्योजक तयार
कर्नाटकातील तवंदी घाटात उद्योग उभारण्यासाठी तातडीने जागा घेण्याची तयारी महाराष्ट्रातील ४५० उद्योजकांनी दर्शविली आहे. त्यादृष्टीने त्यांनी आपली तयारी ‘गोशिमा’कडे लेखी स्वरूपात नोंदविली असल्याचे नूतन अध्यक्ष देवेंद्र दिवाण यांनी सांगितले. ते म्हणाले, वीज, पाणी आणि जमीन या पायाभूत सुविधा योग्य प्रमाणात मिळत नसल्याने महाराष्ट्रातील १६०० उद्योजकांनी कर्नाटकात विस्तारीकरण, स्थलांतरणाचा निर्णय घेतला. कर्नाटक सरकारने त्यांना तवंदी घाटाच्या परिसरात सुमारे ८५० एकर जागा देण्याची तयारी दर्शविली. याबाबत गेल्या दीड महिन्यांपूर्वी कर्नाटक सरकारने जागा मागणी करणाऱ्या एकूण उद्योजकांपैकी ज्यांना तातडीने जमीन हवी आहे, अशा उद्योजकांची माहिती पाठवून द्यावी, असे पत्र ‘गोशिमा’ला पाठविले. त्यानुसार ‘गोशिमा’ने आढावा घेतला असता ४५० उद्योजकांनी तवंदी घाट परिसरातील संबंधित ठिकाणी तातडीने जागा हवी असल्याची मागणी केली आहे.
मंदी नव्हे, संधी माना
उद्योजकांनी सध्याची मंदी
ही आपले उद्योगधंदे
पुनर्रचना करण्याची संधी मानून कार्यरत रहावे, असे आवाहन डॉ. ककडे यांनी केले. ते म्हणाले, भविष्यकाळातील मोठ्या विकासाची तयारी करण्यासाठी उद्योजकांनी संबंधित पुनर्रचना वापरणे आवश्यक आहे.