यशस्वी जीवनासाठी ज्ञान, कौशल्ये आवश्यक
By admin | Published: December 30, 2014 12:03 AM2014-12-30T00:03:28+5:302014-12-30T00:05:23+5:30
एन. जे. पवार : महावीर महाविद्यालयात विद्यापीठाची छात्रसभा
कोल्हापूर : यशस्वी जीवनासाठी ज्ञान, कौशल्ये, दृष्टिकोन व आत्मविश्वास ही चतु:सूत्री आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी आज, सोमवारी येथे केले.
महावीर महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित छात्रसभेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव महावीर देसाई, तर प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, ‘बीसीयुडी’ संचालक डॉ. ए. बी. राजगे प्रमुख उपस्थित होते.
डॉ. पवार म्हणाले, विद्यापीठाचे विविध उपक्रम विद्यार्थ्यांना माहीत व्हावेत. विद्यार्थ्यांच्या समस्या अडचणी विद्यापीठापर्यंत पोहोचविण्यात व त्याचे लगेच निराकरण व्हावे या उद्देशाने छात्रसभा घेण्यात येते. त्यात सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी येथील माहिती संकलित करून आपल्या महाविद्यालयांपर्यंत पोहोचवावी.
देसाई म्हणाले, विद्यापीठाच्या छात्रसभेमुळे विद्यार्थी आणि विद्यापीठ यांच्यातील समन्वय वाढणार आहे. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे अध्यक्ष पंकज मोरे, सचिव श्वेता परुळेकर, आदींची भाषणे झाली. यावेळी विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. संभाजीराव कणसे यांनी स्वागत केले. संध्या जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अरुण पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
शुल्क माफीच्या अर्जांचे वितरण
विद्यार्थी कल्याण मंडळाची सचिव श्वेता परुळेकर हिने शेतकऱ्यांच्या मुलांचे परीक्षा शुल्क माफ व्हावे यासाठी विद्यापीठ व शासनपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी आवश्यक माहिती संकलनासाठी आजच्या छात्रसभेवेळी तिने अर्जांचे वितरण केले. प्रत्येक विद्यार्थी, विद्यार्थिनीला तिने पाच अर्ज दिले आहेत. या अर्जांद्वारे संकलित झालेल्या माहितीच्या आधारावर पुढील दिशा निश्चित केली जाणार असल्याचे पत्रकाद्वारे सांगितले आहे. तांत्रिक मुद्द्यांवरून विद्यापीठाच्या अधिसभेत शुल्कमाफीचा विषय नाकारणे दुर्दैवी असल्याचेदेखील तिने पत्रकात म्हटले आहे.
कोल्हापुरात सोमवारी महावीर महाविद्यालयातील छात्रसभेचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. एन. जे. पवार. शेजारी महावीर देसाई, प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, ए. बी. राजगे, डॉ. दीपाली काळे, डी. आर. मोरे, संभाजीराव कणसे, डी. के. गायकवाड, पंकज मोरे, श्वेता परुळेकर, अरुण पाटील, अक्षय कांबळे उपस्थित होते.