Kolhapur: दोन हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात, दोन पंटरही ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 12:49 IST2025-02-13T12:49:25+5:302025-02-13T12:49:52+5:30
कोडोली : कोडोली येथील मंडल अधिकारी अरुण भानुदास माळगे यांना पंटरमार्फत दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ...

Kolhapur: दोन हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात, दोन पंटरही ताब्यात
कोडोली : कोडोली येथील मंडल अधिकारी अरुण भानुदास माळगे यांना पंटरमार्फत दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने बुधवारी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी माळगेसह पंटर योगेश यशवंत गावडे (रा. कोडोली ) व सुशांत सुभाष चौगुले (रा. शहापूर) यांच्याविरुद्ध कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबतची माहिती अशी ,कोडोली येथील एका शेतकऱ्याची जमीन नावावर करण्यासाठी पन्हाळा येथे १० जानेवारीला रजिस्टर कार्यालयात बक्षीसपत्र दस्तऐवज केला होता. हा दस्त पुढील कार्यवाहीसाठी कोडोली येथील मंडल अधिकारी कार्यालयात आला होता. मंडल अधिकारी यांचा पंटर गावडे याने तक्रारदारांना मंगळवारी (दि. ११) कार्यालयात बोलावून घेतले. तक्रारदार बऱ्याच वेळ कार्यालयात थांबूनही माळगे भेटू न शकलेने ते निघून गेले. पुन्हा गावडे याने तक्रारदार यांना फोन करून शेतजमीन सातबारा पत्रकी नोंद करणेसाठी मंडल अधिकारी यांना २५०० रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
चर्चेअंती दोन हजारचा व्यवहार ठरला. बुधवारी सायकांळी ५ च्या सुमारास मंडल अधिकारी कार्यालयातच पंटरकडे दोन हजार रुपये देताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी मंडल अधिकारी माळगे, पंटर योगेश गावडे व चौगले यांच्याविरुद्ध कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . पोलिस उपधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बापू साळुंखे , सुनील घोसाळकर, सचिन पाटील, संदीप पवार, गजानन कुराडे यांनी काम पाहिले.