कोडोलीत वीस हजार घेऊन गर्भलिंग निदान करताना डॉक्टरला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:49 AM2020-12-17T04:49:42+5:302020-12-17T04:49:42+5:30
कोडोली : येथील मेन रोडवरील मातृसेवा रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अरविंद सीताराम कांबळे (वय ६८, रा. कोडोली) याला २० हजार ...
कोडोली : येथील मेन रोडवरील मातृसेवा रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अरविंद सीताराम कांबळे (वय ६८, रा. कोडोली) याला २० हजार रुपये घेऊन गर्भलिंग निदान करताना बुधवारी सायंकाळी स्टिंग ऑपरेशन करून रंगेहाथ पकडले. डॉ. कांबळे याने आतापर्यंत किती महिलांचे गर्भलिंग निदान केले आहे, याची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. यापूर्वी एकदा अशीच कारवाई झाली असताना ते मशीन बंद ठेवून बेकायदेशीरपणे दुसऱ्या मशीनवर हा डॉक्टर हा काळा धंदा करीत होता.
एका बाजूला सारा देश ‘बेटी बचाओ... बेटी पढाओ’ हे अभियान राबवीत असताना अजूनही गर्भातच मुलीचा गळा घोटण्याची प्रवृत्ती व तिला पैसे घेऊन मदत करणारे नराधम आजही समाजात आहेत हेच या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी हर्षला वेदक, पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक सुनंदा गायकवाड, पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, फौजदार विभावरी रेळेकर, ॲड. गौरी पाटील, ‘अंनिस’च्या कार्यकर्त्या गीता हसूरकर आणि पोलीस कॉन्स्टेबल अभिजित घाडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रकरण थेट न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.
घडले ते असे : डॉ. कांबळे हे गर्भलिंग निदान करीत असल्याबद्दलची तक्रार आरोग्य विभागाकडे आली होती. तो स्त्रीरोगतज्ज्ञ असून सुमारे ३० वर्षे रुग्णालय चालवत आहे. एक गर्भवती महिला पोलीस व गीता हसूरकर यांनी मंगळवारी (दि. १५) जाऊन डॉक्टरची भेट घेतली व आम्हांला पहिली मुलगी असून दुसरी मुलगीच झाल्यास सासरी त्रास होऊ शकतो; त्यामुळे आम्हांला गर्भलिंग चाचणी करायची असल्याचे सांगितले. डॉक्टरने त्यांना तपासणीसाठी बुधवारची वेळ दिली. त्यानुसार सायंकाळी त्या रुग्णालयात गेल्या. संबंधित कॉन्स्टेबल महिला तीन महिन्यांची गरोदर आहे. तपासणीपूर्वी डॉक्टरने सोनोग्राफीचे २० हजार रुपये भरून घेतले. त्यानंतर तपासणी केली असता बाळाचे लिंगनिदान झाले नाही. त्यामुळे अजून एकदा २८ डिसेंबरला या त्यावेळी मुलगा आहे की मुलगी हे स्पष्ट होईल व त्यावेळी गर्भपात करता येईल असे त्याने सांगितले. त्यासाठी वेगळे २८ हजार रुपये द्यावे लागतील असेही स्पष्ट केले. हा सगळी प्रक्रिया पूर्ण होताच डॉ. वेदक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकून त्याला पकडले. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईमुळे कोडोलीसह पन्हाळा तालुक्यातच खळबळ उडाली.
गंभीर तीन गुन्हे
१.एक सोनोग्राफी मशीन जप्त केले असताना दुसरे बेकायदेशीर मशीन आणून त्याचा वापर.
२.परवानगी नसताना सोनोग्राफी करणे
३.गर्भलिंग निदान करून त्याची माहिती देणे
पन्हाळा तालुक्यात मुलींची संख्या सगळ्यात कमी असताना तिथेच अशा पद्धतीने गर्भनिदान चाचणी होणे हे धक्कादायक आहे. अशा प्रकारच्या चाचणी कुठेही होत असल्यास त्याबद्दलची माहिती लोकांनी आरोग्य किंवा पोलीस प्रशासनाला द्यावी.
डॉ. हर्षला वेदक
निवासी वैद्यकीय अधिकारी
सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर
भीती नाही..
महत्त्वाचे म्हणजे २०१७ साली हा डॉक्टर गर्भलिंग निदान करीत असल्याचे उघड झाले होते. त्याच्यावर कारवाई करून त्याच्या रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन सील करण्यात आले होते. पण तरीही त्या मशीनच्या बाजूलाच दुसरे मशीन बसवून तो हा उद्योग करत होता. या प्रकरणातील कारवाईची त्याला भीती नसल्यानेच तो हे करीत होता, अशी चर्चा लोकांत होती.
(फोटो व ओळी कोडोलीहून पाठवल्या आहेत : विश्वास पाटील)